
सामना ऑनलाईन । आग्रा
राजकारणी मंडळी आणि त्यांचे शिक्षण हा तसा संशोधनाचा विषय. कारण यात सत्य कमी आणि थापाच जास्त. असचं काहीसं राजस्थानमधील काँग्रेसचे आमदार गिरिराज सिंह यांच्याबाबत झाल्याचे समोर आले आहे. सिंह यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ते धौलपूर येथील सरकारी महाविद्यालयातून नववी पास झाल्याचे नमूद केले होते. पण ज्या शाळेचे नाव सिंह यांनी नमूद केले ती शाळा फक्त आठवीपर्यंतच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे सिंह यांनी अस्तित्वात नसलेल्या शाळेतून नववी पास केल्याचे दाखवत निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याने त्यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.
सिंह यांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचे समोर आल्यानंतर आग्रा जिल्हा शाळा निरीक्षकांकडे याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांना सिंह यांचा शाळा सोडल्याचा दाखला दाखवण्यात आला. तो पाहताच मुख्याध्यापकांनी तो खोटा असल्याचे स्पष्ट केले. कारण १९९०पर्यंत शाळा फक्त आठवीपर्यंत होती. २०१५ मध्ये ती बारावीपर्यंत करण्यात आली. असे असताना सिंह यांना नववी पास झाल्याचे प्रमाणपत्र मिळालेच कसे असा प्रश्न मुख्याध्यापकांनी केला असून सिंह यांनी दिलेली माहिती व दाखवलेले प्रमाणपत्र, दाखला बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर जिल्हा शाळा निरीक्षकांनी सिंह यांच्याविरोधात फसवणुकीचा खटला दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले.




























































