‘मी इथला भाई आहे’, म्हणत तरुणाची एसटीवर दगडफेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरी फॅक्टरी येथुन सायंकाळी रस्त्याने जात असलेल्या एसटी बसला थांबवून ‘मी इथला भाई आहे’ असे म्हणत एका तरूणाने बसवर दगडफेक केली. या घटनेत बसचे नूकसान झाले असून एक महिला प्रवासी जखमी झाली आहे. याप्रकरणी राहुरी फॅक्टरी येथील सागर उल्हारे या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंड आगारात एसटी बस चालक संदीप नारायण मोरे, (वय 34), हे दिनांक 8 मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान बस क्रमांक एम एच 14 बीटी 1228 ही बारामती ते शिर्डी बस घेऊन निघाले होते. दरम्यान राहुरी फॅक्टरी येथील ताहराबाद चौकात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रवासी गाडीतुन खाली उतरत असतांना एक इसम मोटरसायकलवर आला व मला म्हणाला की, ‘मी येथील भाई आहे’. असे म्हणुन त्याने बस चालकाला शिवीगाळ करुन एस. टी. बसवर दगडफेक केली. तेव्हा चालक त्याला म्हणाला की, ‘आम्ही काय केले विनाकारण तु आम्हाला कशाला काय म्हणतो’, तेव्हा तो म्हणाला की, ‘मी येथील भाई असुन या चौकात मी ज्याला थांब म्हणतो, ते सर्व थांबतात’. असे म्हणुन पुन्हा शिवीगाळ करुन येथुन पुढे तुम्ही एस. टी. नेलीतर तुमचा बेतच पाहतो अशी धमकी दिली.

सदर इसमाने एस. टी. बसवर दगडफेक केली. त्यामुळे एस. टी मधील असलेली महीला प्रवाशी शारदा श्रीकांत नाचनेकर, (वय 50 वर्षे, रा. सांताक्रूझ, मुंबई) यांना किरकोळ दुखापत झाली असुन एस. टी. बसचे नुकसान झाले. यावेळी एस.टी. बस मध्ये एकुण 50 ते 55 प्रवासी होते. त्यानंतर चालकाने तेथील लोकांना सदर इसमाचे नाव गाव विचारले असता त्याचे नाव व गाव सागर उल्हारे रा. राहुरी फक्टरी ता. राहुरी असे सांगितले.

हा तरुण मोटारसायकल क्र. एम एच 17 सी 7713 अला होता. त्यानंतर चालक एस. टी. बस घेउन राहुरी पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्यसाठी आले. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी सागर उल्हारे, रा. राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी. याचे विरुद्ध गुन्हा रजि. नं. 480/2023 भादंवि कलम 337, 427, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास पोलीस करत आहेत.