
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण तापले असून, महायुती आणि महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. भाजप निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी देणार की पुन्हा एकदा राजकीय ‘सेटिंग’ करून बाहेरील चेहऱ्याला उमेदवारी देणार, यावरून पक्षांतर्गत चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या एका निर्णयावर संपूर्ण राजकीय समीकरणे ठरणार असल्याने इच्छुकांनी मुंबईपासून अहिल्यानगरपर्यंत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सचिन जगताप, तनपुरे, घुले, ढाकणे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
दिवंगत आमदार अरुणकाका जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी कुटुंबातील व्यक्तीला संधी मिळावी, अशी मागणी समर्थकांकडून होत आहे. त्यानुसार आमदार संग्राम जगताप यांचे बंधू तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी विधानपरिषदेची तयारी सुरू केली आहे.
राहुरी पोटनिवडणुकीत माघार घेतलेले माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव अचानक चर्चेत आले आहे. निवडणुकीपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी तनपुरेंची घेतलेली भेट आणि त्यानंतर झालेली माघार यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते. त्यावेळी तनपुरेंना ‘पुनर्वसनाचा शब्द’ देण्यात आल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. तनपुरेंची वर्णी लागल्यास भाजपमधील निष्ठावंतांमध्ये नाराजी निर्माण होणार आहे.
महाविकास आघाडीतूनही वेगाने हालचाली सुरू आहेत. शेवगावचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले आणि केदारेश्वर साखर कारखान्याचे सर्वेसर्वा प्रताप ढाकणे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संपर्क, आर्थिक ताकद आणि राजकीय समीकरणे लक्षात घेता, दोघेही दावेदार मानले जात आहेत.
जिल्ह्यात 461 मतदार; संख्याबळ भाजपच्या बाजूने
विधानपरिषद निवडणुकीसाठी महापालिकेतील 73 नगरसेवक, नगरपालिकांतील 312 सदस्य आणि नगरपंचायतीतील 76 सदस्य असे एकूण 461 मतदार मतदान करणार आहेत. जि.प. आणि पंचायत समिती निवडणुका रखडल्याने 75 जि.प. सदस्य आणि 12 पंचायत समिती सभापतींना मतदानाचा अधिकार मिळणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप आणि महायुतीचे संख्याबळ तुलनेने मजबूत असल्याचे मानले जात असल्याने उमेदवारीवरून इच्छुकांमध्ये चुरस वाढली आहे.



























































