नगर – सिव्हीलचा आयसीयू जानेवारीत रूग्णांच्या सेवेत, आग कशामुळे लागली अद्यापही स्पष्ट नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या नगर जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. हा अतिदक्षता विभाग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रूग्णांच्या सेवेत सुरू होणार आहे. गेल्या वर्षी जिल्हा रूग्णालयातील हे अग्नितांडव प्रकरण राज्यभर गाजले होते. एवढे होऊन देखील सुद्धा अद्याप पर्यंत या रुग्णालयाला आग कशामुळे लावली हे सरकारने जाहीर केलेले नाही

जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीमध्ये 14 जणांचा हुरपळून मृत्यू झालेला होता हे प्रकरण राज्यभर गाजलेले होते. विभागीय आयुक्तांच्या मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले होते. तत्कालीन विभागीय आयत्यांनी चौकशी केल्यानंतर त्याचा अहवाल राज्य शासनाला देण्यात आलेला होता. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये धाव घेत या प्रकरणाकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर शासनाने याची चौकशी पूर्ण केली. मात्र, दुसरीकडे ही आग कशामुळे लागली, हे आजतागायत कोणीही जाहीर केले नाही. राज्याचे महसूल मंत्री तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मागील महिन्यामध्ये या आगीचे कारण आपण स्पष्ट करू असे सांगितले. मात्र, तेही त्यांनी अद्यापपर्यंत केलेले नाही. या प्रकरणांमध्ये चार जणांना अटकही करण्यात आली होती, त्यांचे जामीन झालेले आहेत तर दुसरीकडे या प्रकरणाची सखल चौकशी करावी अशी मागणी सुद्धा केलेली आहे.

जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागात मागील वर्षी 7 नोव्हेंबरला आग लागली होती. भाऊबीजेच्या दिवशी ही भीषण घटना घडली होती. हलगर्जीपणामुळे ही आगीची घटना घडली होती. या घटनेत सुरुवातीला 11 रुग्णांचा आगीने होरपळून मृत्यू झाला होता. त्यांनतर तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेत एकूण 14 जणांचा बळी गेला होता. या प्रकरणी त्याच वेळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता, तसेच जिल्हा शासकीय रूग्णालयातील सहा जणांना निलंबित केले होते.

घटनेची राज्य सरकारने तातडीने दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यीय समिती गठीत केली होती. या समितीने सदर घटनेची चौकशी करून अतिदक्षता विभागाला आग कशामुळे लागली, याची चौकशी केली. चौकशी समितीने सदरचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केला. परंतु, राज्य सरकारने हा चौकशी अहवाल अद्यापही जाहीर केलेला नाही. त्यामुळे अतिदक्षता विभागाला आग कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेले नाही. दरम्यानच्या काळात निलंबित अधिकारी व कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत रूजू करून घेण्यात आले आहे. अतिदक्षता विभागाच्या नूतनीकरण कामास जूनमध्ये सुरुवात करण्यात आली होती. नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा विभाग रूग्णांच्या सेवेत सुरू होणार असल्याचे जिल्हा रूग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. अतिदक्षता विभागात 18 बेड असून सेंट्रल मॉनिटरींग, ऑक्सिजन सिस्टिम तसेच दहा व्हेंटिलेटर अशी सुविधा करण्यात आलेली आहे.