
नगर अर्बन बँकेच्या चार शाखा तोटय़ात असल्याने बंद करण्याचा निर्णय प्रशासकांनी घेतला आहे. आर्थिक गैरव्यवहाराने आधीच गाजत असलेल्या अर्बन बँकेच्या तोटय़ातील शाखा एकापाठोपाठ एक बंद होत असल्याने सभासदांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, शाखा बंद करण्याचा निर्णय कटू पण योग्य आहे, असे नगर अर्बन बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी सांगितले.
गांधी म्हणाले, बँकेवरील प्रशासकांनी तोटय़ात असलेल्या शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी पुणे जिल्ह्यातील चाकण व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शाखा काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आल्या आहेत व आता 21 मे 2021 रोजी झालेल्या बँक अधिकाऱयांच्या बैठकीतील ठरावाप्रमाणे नगर जिल्ह्यातील शिर्डी व कोपरगाव तसेच पुणे जिल्ह्यातील चंदननगर व दौंड या तोटय़ात असलेल्या शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 31 ऑगस्ट 2021 पर्यंत या शाखा बंद करण्यात येणार आहेत.
अनेक गैरप्रकारांचा वारसा
माजी संचालक गांधी यांनी नगर अर्बन बँकेत अनेक गैरप्रकार झाल्याचा दावा केला. पिंपरी-चिंचवड येथील 22 कोटींच्या कर्ज फसवणुकीसह नगरमधील 3 कोटींच्या चिल्लर घोटाळ्यांचे प्रकार पोलिसांत तक्रारी दाखल झाल्याने उघड झाले, असे ते म्हणाले.s.
नव्या शाखांतून लुटीचे नियोजन
बँकेला लुटण्यासाठी बँकेच्या नवीन शाखा उघडण्याचा धडाका लावला गेला होता. 2008 ते 2012 या कालावधीत तब्बल 15 नवीन शाखा सुरू करण्यात आल्या व यातील दोन-तीन शाखांचा अपवाद वगळता सर्वच शाखा प्रारंभीपासूनच तोटय़ात आहेत. या शाखांच्या उद्घाटन कार्यक्रमातील भ्रष्टाचाराचे मुद्देही महाराष्ट्रात गाजले, असे सांगून गांधी म्हणाले, नवीन शाखेसाठी जागा भाड्याने घेण्यात आर्थिक फायदा, शाखेचे फर्निचर तसेच लाइट काम व रंगरंगोटीमध्ये वाढीव खर्च दाखवून आर्थिक लाभ करून घेण्याचे उद्देश होते. पण यामुळे बँकेचे आर्थिक नुकसान झाल्याचे व आता यातील सहा शाखा तोटय़ामुळे बंद पडल्याचे वास्तवही समोर आले, असेही गांधींनी सांगितले.



























































