नगर जिल्हा हादरला, श्रीगोंद्यात दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यातील श्रीगोदा या तालुक्याच्या शहरातील एका नामांकित महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींवर दोन तरुणांनी चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून याप्रकरणी दोन तरुणांवर आणि मध्यस्थी केलेल्या एका मुलीवर श्रीगोंदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा शहरातील एका नामांकित महाविद्यालयात घारगाव येथील दोन मुली आणि दौंड तालुक्यातील शिरापूर येथील एक मुलगी अकरावीमध्ये शिकतात. या तिघी जणी हॉस्टेलमध्ये एकाच खोलीत राहून शिक्षण घेत होत्या. शिरापूर येथील मुलीने आरोपी सोहेल रियाज जकाते आणि जिशान कलीम जकाते यांच्यासोबत पीडित तरुणींची ओळख करून दिली होती.

मुलींनी त्यांच्यासोबत मैत्री करावी यासाठी ती मध्यस्थी करत होती आणि भेटीचे फोटोही तिने काढले होते. याचाच गैरफायदा घेत आरोपींनी सदर फोटो घरच्यांना दाखवून व्हायरल करू अशी धमकी देत पीडित मुलींना पेडगाव रस्त्यावरील एका लॉजवर बोलावून चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला. गेल्या तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.

मात्र हा त्रास असह्य झाल्याने पीडित मुलींनी पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी शिरापूर येथील मुलगी आणि दोन तरुणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर अभंग करत आहेत.

दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी असणारी शिरापूर येथील विद्यार्थिनीचे अनेक मानलेले भाऊ, मावसभाऊ, गुरूभाऊ, हॉटेल चालक व सर्व जाती धर्मातील भाऊ यांच्याशी संपर्क असून ती नाममात्र शिक्षणासाठी कॉलेजमध्ये येते. तिचा खरा व्यवसाय एजंटगिरी हा आहे. हिच्यामुळे अनेक विद्यार्थिनींची फसगत झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.