शेवगावात भांडण मिटवायला गेलेल्या पोलिसावर कोयत्याने हल्ला, दोन बोटं तुटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेवगाव तालुक्यातील कोळगाव येथे दोन गटातील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसावर कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्याची दोन बोटं तुटली आहेत. रविवारी रात्री हा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी अर्जुन विठ्ठल खंडागळे (वय – 48) व ज्ञानेश्वर रामा खंडागळे (वय – 20, दोघे रा. कोळगाव, ता. शेवगाव) या दोघांवर, तर दोन गटातील मारहाणीप्रकरणी अण्णा तुकाराम खंडागळे (वय 55, रा. कोळगाव, ता. शेवगाव) यांच्यावर स्वतंत्रपणे खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

या हल्ल्यात जखमी झालेले पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप उबाळे यांच्यावर संभाजीनगर येथे, तर जमावातील हल्ल्यात जखमी झालेल्या पाच जणांवर नगर येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरोपींनी परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे. घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आशिष शेळके हे करीत आहेत.