
नगर जिल्ह्यात यंदा 17 सहकारी व 9 खासगी अशा 26 साखर कारखान्यांकडून नगर विभागात उसाचे गाळप सुरू आहे. आतापर्यंत 84 लाख टन उसाचे गाळप झाले असून, 79 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. ऊसगाळपात नेहमीप्रमाणे खासगी साखर कारखान्यांची आघाडी असल्याचे दिसून येत आहे. यंदा विभागात ऊस अधिक असल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
नगर विभागात यंदा 17 सहकारी, तर 9 खासगी अशा 26 साखर कारखान्यांकडून उसाचे गाळप सुरू आहे. त्यांतील नगर जिल्ह्यातील 22 व नाशिक जिल्ह्यातील 4 साखर कारखान्यांचा समावेश आहे. विभागात सुरू असलेल्या साखर कारखान्यांची दररोजची गाळपक्षमता एक लाख 10 हजार 250 टन आहे. सध्या दररोज एक लाख पाच हजार टनपर्यंत उसाचे आणि तेवढेच क्विंटल साखर उत्पादन होत आहे. ऊसगाळपात संगमनेर, ज्ञानेश्वर, मुळा हे सहकारी साखर कारखाने सोडले, तर यंदाही खासगी कारखानेच आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत राशिनच्या अंबालिका साखर कारखान्याने सर्वाधिक साडेनऊलाख टनपर्यंत उसाचे गाळप केले आहे.
अतिरिक्त उसाचा प्रश्न
यंदा सुमारे एक कोटी 20 लाख टन ऊस उपलब्ध असून, नगर जिल्ह्यात सुमारे सव्वा कोटी टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे. त्यात कार्यक्षेत्राबाहेरील 20 लाख टन ऊस येण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा किमान 10 लाख टन अधिक उसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात अतिरिक्त ऊस असल्याने अतिरिक्त उसाचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.






























































