83 पिलरवर उभा राहणार नगरमधील उड्डाणपूल, प्रत्यक्ष कामाला झाली सुरुवात

शहरातील उड्डाणपुलाच्या पिलर उभारणीस सुरुवात झाली आहे. हे काम स्टेट बँकेपासून कोठीपर्यंत करण्यात येत आहे. या उड्डाणपुलास एकूण 83 पिलर राहणार आहेत. दरम्यान, युटिलिटीच्या कामांनाही लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.

सक्कर चौक ते स्टेट बँक चौकदरम्यान सुमारे तीन किमी अंतराच्या उड्डाणपुलाचे काम करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत हे काम केले जात असून, यासाठी सुमारे पावणेचारशे कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. तर, उड्डाणपुलाच्या युटिलिटी कामासाठी राज्य सरकारने 52 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. यातील 17 कोटी 50 लाखांचा पहिला हप्ता मनपाला यापूर्वीच प्राप्त झालेला आहे. सक्कर चौक व चांदणी चौक या दोन ठिकाणी रॅम्प करण्यात येणार आहेत. उड्डाणपुलाचे काम गुजरातच्या अग्रवाल या बांधकाम संस्थेला देण्यात आलेले आहे.

या अगोदर भूसंपादन रखडल्याने उड्डाणपुलाचे काम लांबणीवर पडले होते. मात्र, आता दोन ते तीन टक्के जागेचे भूसंपादन वगळता सर्व भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागल्याने जानेवारीपासून उड्डाणपुलाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या कामात वाहतुकीचा अडथळा येऊ नये म्हणून रस्त्याच्या मध्यभागी पत्रे ठोकण्यात आले आहेत. सध्या पिलरच्या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे. स्टेट बँक चौकापासून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे.

अतिक्रमण काढण्याचे मनपाचे आदेश

उड्डाणपुलाच्या कामात अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. प्रारंभी शिल्पा गार्डन ते यश पॅलेसपर्यंतचे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. येथील अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढावे; अन्यथा मनपाकडून अतिक्रमण काढण्यात येण्यात आहे, असे मनपा अतिक्रमण विभागप्रमुख सुरेश इथापे यांनी सांगितले. काहींनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित अतिक्रमणे लवकरच काढण्यात येतील. काही जागेचे अधिग्रहण बाकी असल्याने त्यांना यासंबंधी अद्याप सूचना देण्यात आलेली नाही, असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या