स्थायी सभापती निवडीनंतरच नगर मनपाचे बजेट, निवडणुकीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर महापालिकेच्या आगामी वर्षाच्या बजेटची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. प्रशासनाकडून बजेट अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, स्थायी समितीचे सभापतिपद रिक्त असल्यामुळे सभापती निवडीनंतरच मनपाकडून ‘स्थायी’कडे बजेट सादर करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शंकर गोरे यांनी दिली. दरम्यान, सभापती निवडणुकीचा प्रस्तावही विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.

गेल्या महिनाभरापासून मनपा प्रशासनस्तरावर बजेटची तयारी सुरू आहे. लेखा विभागाने सर्व विभागांकडून तरतुदींचे प्रस्ताव मागविले होते. त्यावर अनेकवेळा बैठकाही घेण्यात आल्या. त्यानंतर आता बजेट अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या दोन-चार दिवसांत बजेटचे कामकाज पूर्ण होणार आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या सदस्य निवडीवेळी सभापती अविनाश घुले यांनी राजीनामा दिल्यामुळे प्रशासनाकडून स्थायीकडे बजेट सादर होण्यास विलंब होणार आहे. प्रशासनाने दर करवाढीचा प्रस्ताव यापूर्वी स्थायी समितीकडे पाठविला होता. त्यांनी तो आता महासभेकडे पाठविला आहे. 19 फेब्रुवारीपूर्वी त्यावर निर्णय झाल्यास तो अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला जाईल. त्यात मंजुरी मिळाली तरच बजेटवर त्याचा परिणाम होईल. मनपाकडून बजेट तयार झाले आहे. अंतिम तपासणी सुरू आहे.

सभापती निवडणुकीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविलेला असून, सभापती निवडणूक झाल्यावरच मनपा प्रशासनाकडून स्थायी समितीकडे बजेट सादर केले जाणार असल्याचे आयुक्त गोरे यांनी सांगितले.