धोकादायक इमारतींवर नगर मनपाचा अखेर हातोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहरातील धोकादायक इमारतींवर मनपाने आजपासून पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू केली आहे. मनपाने आज सकाळी माळीवाडा परिसरातील भोपळे गल्लीतील दोन मजली धोकादायक इमारत उतरविली. दुपारनंतर चौपाटी कारंजा येथे कारवाई करण्यात आली.

माळीवाडय़ातील या इमारतीचा काही भाग गेल्या वर्षी कोसळला होता. त्यामुळे या इमारतीपासून मनपाने कारवाईस सुरुवात केली आहे. मनपाचे शहर अभियंता सुरेश इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता निंबाळकर, अमोल लहारे, अतिक्रमण विभागाचे रिजवान शेख, अर्जुन जाधव यांच्यासह विद्युत विभागाच्या कर्मचाऱयांनी ही कारवाई केली. यावेळी कोतवाली पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मनपाने शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून यादी तयार केलेली आहे. त्यानुसार धोकादायक म्हणून घोषित केलेल्या इमारतींवर मनपाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. मनपाने शहर व उपनगरातील अति धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. इमारत मालकांनी स्वतःहून इमारती उतरवून घ्याव्यात; अन्यथा मनपाकडून कारवाई करण्यात येईल. तसेच, याबाबतचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, अशा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही संबंधितांकडून इमारती उतरवून घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे मनपाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

मंगळवारी सकाळी भोपळे गल्ली येथील धोकादायक इमारत पाडण्यात आली आहे. दुपारी चौपाटी कारंजा येथील इमारतीवर कारवाई करण्यात आली. अति धोकादायक 15 इमारती पाडण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 7 इमारतींवर कारवाई केली जाणार आहे.
– सुरेश इथापे (शहर अभियंता, नगर मनपा)