थकीत वेतन, बोनस मिळेपर्यंत कचरा उचलणार नाही, ‘स्वयंभू’च्या सफाई कर्मचाऱ्यांचे नगर महापालिकेत ठिय्या आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळीपूर्वी बोनस आणि तीन महिन्यांचे थकीत वेतन देण्याच्या मागणीसाठी स्वयंभू ट्रान्सपोर्ट या कचरा उचलणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी नगर महापालिकेत ठिय्या आंदोलन केले. शिवसेनाप्रणीत कामगार सेनेनेही या आंदोलनाला पाठिंबा देत, दिवाळीपूर्वी मागण्या मान्य न केल्यास ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. वेतन आणि बोनस मिळेपर्यंत शहरातील कचरा न उचलण्याची भूमिका सफाई कर्मचाऱ्यांनी घेतल्यामुळे ऐन दिवाळीत शहराची कचराकोंडी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यासंदर्भात लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, कामगार सेनेचे शहरप्रमुख गौरव ढोणे, सलीम शेख, सागर गुडा, राजू देशमाने यांच्यासह सफाई कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. नगर शहरात महानगरपालिकेने स्वयंभू ट्रान्सपोर्टला कचरा उचलण्याचा ठेका दिला आहे. मात्र, घनकचरा घोटाळा प्रकरणात या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. तसेच दिवाळी बोनसही मिळालेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आज महापालिकेत ठिय्या आंदोलन केले. शिवसेनेनेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी प्रशासनाकडून संबंधित कर्मचारी खासगी ठेकेदाराकडील आहेत. हा त्यांचा अंतर्गत विषय असल्यामुळे आम्ही यामध्ये थेट बोलू शकत नाही, असे सांगण्यात आले. या संदर्भात संबंधित ठेकेदारानेच काय तो निर्णय घ्यावा, असे चर्चेमध्ये पुढे आले. मात्र, न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असून, उद्यापासून कचरा संकलन न करण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

यावेळी उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव आणि कामगार सेनेचे शहरप्रमुख गौरव ढोणे यांनी कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही दिली. यावेळी गिरीश जाधव यांनी मनपा प्रशासनाला धारेवर धरले. कचरा संकलन केंद्राच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहेत की नाही, याची विचारणा केली. मात्र, ते कॅमेरे बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रशासनाचा गोंधळ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.