
सामना प्रतिनिधी । नगर
महापालिकेत घनकचरा व्यवस्थापन विभागात आऊटसोर्सिंगद्वारे विविध कर्मचार्यांच्या भरतीला विरोध करत कर्मचारी युनियनने दिलेल्या संपाच्या नोटिसीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या विषयावर युनियनशी चर्चाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे मंगळवारपासून मनपाचे कर्मचारी संपावर जाणार असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिली.
घनकचरा विभागात सॅनिटरी इन्स्पेक्टर, संगणक ऑपरेटर व अभियंत्यांच्या नियुक्तीसाठी मनपाने खासगी कंत्राटदाराकडून निविदा मागविलेली आहे. कर्मचारी युनियने याला आक्षेप घेत कर्मचार्यांच्या पदोन्नत्तीने ही पदे भरण्याची मागणी केलेली आहे. या संदर्भात युनियनने नोटीस बजावून 26 मार्चपासून संपावर जाण्याचा इशाराही दिला होता. मात्र, प्रशासनाने याची कुठलीही दखल घेतलेली नाही. युनियनशी साधी चर्चाही करण्याची तयारी प्रशासनाने दर्शविलेली नाही. त्यामुळे कर्मचारी मंगळवारपासून संपावर जात असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.
दरम्यान, कर्मचार्यांच्या कालबध्द पदोन्नत्तीच्या फरकाच्या रकमाही मनपाने दिलेल्या नाहीत. सुमारे पावणेदोन कोटी रुपये थकीत आहेत. मनपाकडून 10 लाख, 20 लाख रुपये देण्याची तयारी दाखविली जात आहे. मात्र, सर्व रकमा तत्काळ मिळाव्यात, अशी कर्मचार्यांची मागणी आहे. याबाबतही आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला होता. प्रशासनाशी या विषयावर चर्चेत तोडगा न निघाल्यामुळे आंदोलनावर आम्ही ठाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.





























































