नगर अर्बन बँक प्रकरण – अधिकाऱयांच्या सांगण्यावरूनच बनावट व्हॅल्यूएशन रिपोर्ट बनविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर अर्बन बँकेच्या 150 कोटींच्या फसवणूक प्रकरणातील एक-एक कारनामे समोर येत आहेत. बँक अधिकाऱयांच्या सांगण्यावरूनच बनावट व्हॅल्यूएशन रिपोर्ट तयार केल्याचे अटकेतील आरोपीच्या चौकशीतून समोर आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून याची खातरजमा केली जात आहे. मात्र, यामुळे बँकेचे अधिकारी अडचणीत आले आहेत.

नगर अर्बन बँकेची 150 कोटींची फसवणूक केल्याची फिर्याद नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. सुरुवातीला पोलिसांनी सचिन गायकवाड याला अटक केली. त्यानंतर कर्ज प्रकरणाचे गूढ बाहेर आले आहे.

बँकेकडे तारण ठेवलेल्या सुमारे पाच मालमत्तांचे मूल्यांकन जास्त दाखवले गेले होते. यासाठी गायकवाडने व्हॅल्यूअरच्या बनावट सह्यांसह खोटा रिपोर्ट सादर केला असल्याची बाब पोलीस तपासातून समोर आली आहे. बनावट व्हॅल्यूएशन रिपोर्ट तयार केल्याप्रकरणी मुकेश कोरडे याला अटक केली आहे. मात्र, चौकशीत त्याने अधिकाऱयांच्या सांगण्यावरून बनावट रिपोर्ट तयार केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बँकेचे अधिकारी अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. कोरडे याने अधिकाऱयांची नावे घेतली असली तरी या संदर्भात सर्व बाजूंनी खातरजमा केली जाईल. या प्रकरणात बँकेच्या अधिकाऱयांचीही चौकशी व जबाब होणार असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले आहे.

संचालकांची चौकशीला हजेरी

नगर अर्बन बँकेतील कर्ज प्रकरणे व घोटाळ्यांसंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेने तपासात लक्ष केंद्रित केले आहे. तपासकामी बँकेच्या संचालकांना चौकशीसाठी बोलावणे धाडले होते. त्यानुसार सोमवारपासून संचालकांनी चौकशीला हजेरी लावून माहिती सादर करण्यास सुरुवात केली आहे. आणखी काही दिवस ही चौकशी चालेल, असे आर्थिक गुन्हे शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.