रुग्णासाठी एक, तर ऑडिटसाठी दुसरे बिल; नगरमध्ये खासगी रुग्णालयांकडून लूटमारीची नवी पळवाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगरमधील काही रुग्णालये कोरोनाबाधित रुग्णांचे शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे व रुग्णालयाने आपल्या मर्जीप्रमाणे आकारत असलेल्या दराप्रमाणे, अशी दोन प्रकारची बिले केली जातात. मात्र, लेखापरीक्षकाकडे पाठविताना शासनाने निश्चित केलेल्या दराचे बिल पाठविण्यात येत असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केला आहे. प्रत्यक्षात त्याप्रमाणे रुग्णाकडून शुल्क घेण्यात येत नाही. ही बाब अत्यंत गंभीर व रुग्णांची फसवणूक करणारी आहे. त्यामुळे या प्रकाराची स्वतंत्र पथक नेमून चौकशी करण्याची मागणी त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, काही रुग्णालयांनी आकारलेल्या शुल्काबाबत कोणतीही तक्रार करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्याचा आरोपही शेख यांनी केला आहे.

राज्य शासनाने खासगी व धर्मादाय रुग्णालयांना कोरोना रुग्णांसह इतर आजारांसाठी शुल्क निश्चित केले आहे. मात्र, नगर महापालिका हद्दीतील बहुसंख्य कोविड सेंटर व खासगी रुग्णालयांकडून त्याप्रमाणे शुल्क आकारणी केली जात नाही. यातून रुग्णांची मोठी लूट सुरू आहे. खासगी रुग्णालयांना बेड, पीपीए किट, सीटी स्कॅन, आरटीपीसीआर चाचणीसह विविध उपचारांसाठी दर निश्चित केलेले आहेत. हे दरफलक दर्शनी भागावर लावणे बंधनकारक केले आहे. मात्र, अनेक रुग्णालयांनी रुग्णांना वाचता येणार नाही अशा बारीक मजकुरात फलक लावले आहेत. कोविड सेंटर व रुग्णालयांमध्ये महापालिकेने रुग्णांचे बिल तपासण्यासाठी लेखापरीक्षक नियुक्त केलेले आहेत. मात्र, रुग्णालयांकडून रुग्णांचे दोन प्रकारचे बिल तयार केले जाते. ही बाब गंभीर व रुग्णाची फसवणूक करणारी असल्याचे शेख यांनी म्हटले आहे.

मागील वर्षभराचे लेखापरीक्षण करावे

n राज्य सरकारने स्वतंत्र चौकशी पथक नेमावे, तसेच 21 मे 2020पासून सर्व रुग्णालयांतील संपूर्ण बिलाचे लेखापरीक्षण करण्यात यावे. संबंधित रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी भरलेल्या बिलांच्या प्रमाणित प्रती ताब्यात घेण्यात याव्यात. हे शुल्क आकारताना ज्या रुग्णालयांना शासनाची महात्मा फुले आरोग्य योजना लागू आहे, त्या रुग्णालयामध्ये किती रुग्णांनी लाभ घेतलेला आहे, त्या रुग्णांकडून स्वतंत्ररीत्या शुल्क आकारणी केली आहे का? रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी अनामत रक्कम भरून घेतली आहे का? रुग्णांवर उपचार करत असताना रुग्ण व रुग्णाच्या नातेवाइकांना बाहेरून औषधे, साधनसामग्री आणण्यास भाग पाडले आहे का? या सर्व मुद्दय़ांची तपासणी होणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने स्वतंत्र पथक निर्माण करून नगर मनपा हद्दीतील रुग्णालयांचे ऑडिट करावे, अशी मागणी शेख यांनी केली आहे.