अतितत्पर प्रशासनामुळे आष्टीतून कर्जतला येणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीना नदीवर पूल नसल्याने आष्टी तालुक्यातील हिंगणी गावातून कर्जतमध्ये शिक्षणासाठी येणाऱया विद्यार्थ्यांना नदी ओलांडण्यासाठी जुगाड तयार करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करण्याऐवजी चक्क हे जुगाडच जप्त करून नेल्यामुळे या विद्यार्थ्यांची शाळाच बंद झाली असून, या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आष्टी तालुक्यातील हिंगणी गावामधील चौधरी व पावशे वस्तीवरील विद्यार्थी शिक्षणासाठी कर्जत तालुक्यातील नागलवाडीला येतात. मात्र, सध्या सीना नदीला पूर आलेला असल्यामुळे व नदीवर पूल नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. चौधरी व पावशे वस्ती ही दोन्ही गावे सीना नदीच्या काठावर आहेत. या वस्त्या आष्टी तालुक्यामधील असल्या तरी यांचे दैनंदिन व्यवहार व शिक्षण हे कर्जत तालुक्यातील नागलवाडी व मिरजगाव परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणामध्ये आहेत.

आष्टी व कर्जत तालुक्यातील हद्दीमधून वाहणाऱया सीना नदीत मोठय़ा प्रमाणामध्ये वाळूमाफियांकडून अवैध वाळूउपसा सुरू आहे. नदीपात्रामध्ये मोठी खड्डे पडले आहेत. यामुळे त्या ठिकाणी अपघात झाल्यास धोका होऊ शकतो. त्यामुळे चौधरी व पावशे वस्ती येथील ग्रामस्थांनी कर्जतच्या तहसीलदारांकडे तक्रार केली होती. या तक्रारीत सीना नदीमधून विद्यार्थ्यांना नदी ओलांडण्यासाठी जुगाड तयार करण्यात आले आहे. त्यामधून जाताना धोका होऊ शकतो, असे म्हटले. यावर कर्जत व आष्टीच्या तहसीलदारांनी नदीपात्रामधून विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने जुगाड तयार करून घेऊन जाणे धोकादायक आहे, असे कारण दाखवून हे जुगाड जप्त केले आहे. एवढेच नव्हे तर नागलवाडी येथील विद्यालयातील शिक्षकांना आष्टी तालुक्यातील या दोन वस्त्यांवरील मुले शाळेमध्ये येऊ देऊ नका, अशा सूचनादेखील दिल्या आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची शाळा बंद झाली आहे. प्रशासनाने व संबंधित लोकप्रतिनिधींनी या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेऊन सीना नदीवर तातडीने पूल मंजूर करण्याची मागणी ग्रामस्थ आणि पालकांकडून करण्यात येत आहे.