
इस्रोने आज श्रीहरिकोटा येथे गगनयान मोहिमेसाठी पहिली एअर ड्रॉप टेस्ट केली. पॅराशूटच्या माध्यमातून ही चाचणी करण्यात आली. हिंदुस्थानी हवाई दलाच्या चिनूक हॅलिकॉप्टरच्या सहाय्याने क्रू मॉडय़ूल 4 किमी उंचीवरून खाली सोडण्यात आले. गगनयान मोहिमेपूर्वी पॅराशूटची विश्वासार्हता तपासणे हा या चाचणीमागचा उद्देश होता. अंतराळातून क्रू मॉडय़ूल आणणारे पॅराशूट वेळेवर उघडते आहे का, सुरक्षित लँडिंग होते का हे तपासण्यात आले. हिंदुस्थानचे हवाई दल, डीआरडीओ, नौदल आणि हिंदुस्थानी तटरक्ष दलाच्या वतीने संयुक्तपणे ही चाचणी यशस्वी करण्या आली.
डिसेंबरमध्ये पहिले मानवरहित उड्डाण
इस्रोचे प्रमुख वी. नारायणन यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले की, गगनयानचे पहिले मानवरहित उड्डाण (जी 1 मिशन) यंदा डिसेंबरमध्ये होणार आहे. या उड्डाणात अर्ध-मानवाकृती रोबोट ‘व्योममित्रा’ अंतराळ प्रवास करणार आहे. मोहिमेचे सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत जवळपास 7,700 चाचण्या पूर्ण झाल्या असून 2,300 चाचण्या बाकी आहेत.