
लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या ‘नीट’ पेपरफुटीमुळे केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ‘नीट’ परीक्षेत कोणताही दगाफटका होऊन पुन्हा पेपरफुटीचा प्रकार घडू नये यासाठी नीटची प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी वायुदलाची मदत घेण्यात येणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नीट पेपरफुटीवरून नामुष्की ओढवलेल्या सरकारमुळे देवा रे देवा… आता आणखी काय काय बघावे लागणार अशी हतबलता विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे.
यंदाची ‘नीट यूजी’ परीक्षा पेपर फुटल्यामुळे रद्द करण्यात आली. 21 जून रोजी फेरपरीक्षा होणार आहे. भविष्यात पेपर फुटायला नको यासाठी संरक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. ‘नीट’ परीक्षेसंदर्भात संरक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानी अचानक ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आल्यामुळे देशाचे लक्ष त्याकडे लागले होते. या बैठकीनंतर धर्मेंद्र प्रधान यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, निर्दोष परीक्षेसाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. यापूर्वी पेपर पोहोचविण्यासाठी टपाल खात्याची मदत घेण्यात येत होती. यावेळी हवाई दलाची मदत घेण्यात येणार आहे. जून महिन्यात पावसाळा सुरू होतो. ते विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. वायुदलाच्या मदतीने पेपर लवकरात लवकर आणि
सुरक्षिततेत परीक्षा केंद्रांवर नेण्यात येतील, असे धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.
या बैठकीत ‘नीट’ परीक्षा अधिक पारदर्शक आणि ‘फुलप्रूफ’ करण्याबाबत विविध मुद्दय़ांवर सखोल चर्चा झाली. परीक्षा केंद्रांवर कडक पहारा ठेवण्यात येणार असून पेपरफुटीचे सर्व मार्ग बंद होतील अशा पद्धतीने उपाययोजना आखण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून प्रश्नपत्रिका पोहोचवण्याची जबाबदारी वायुदलावर सोपविण्यात आली आहे.
पाणी पिण्याच्या सल्ल्याचे विद्यार्थ्यांनी काय करावे?
युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिब यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, की पंतप्रधान मोदी हे लाखो रुपये खर्च करुन मंत्रिमंडळाची बैठक बोलावतात आणि मंत्र्यांना हायड्रेटेड राहण्याचा सल्ला देतात. ठनीटठच्या 22 लाख विद्यार्थ्यांना आपण कोणाच्या दारी डोके आपटावे, हे माहिती नाही. जास्त पाणी पिण्याच्या सल्ल्याचे काय करावे, हे सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना ठावूक नाही. त्यांच्या डोळ्यांमधील पाणी आटले आहे. याच मुलांच्या कुटुंबियांची मते घेऊन आमदार-खासदार या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होताना पाहत आहेत. चांगलाच तमाशा सुरू आहे, मात्र, त्यांना लाज वाटत नाही.
शुल्क परताव्यासाठी माहिती भरण्यास मुदतवाढ
‘नीट’ परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शुल्क परत करण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते. त्यासाठी बँक खात्याची माहिती जमा करण्याची अंतिम मुदत 22 जून रोजी रात्री 11.50 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 27 मेपर्यंत होती.
पंतप्रधान मोदींचे लक्ष
21 जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेच्या तयारीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः लक्ष ठेवून आहेत. परीक्षा प्रक्रियेबाबत प्रत्येक घडामोडींबाबत त्यांना सविस्तर माहिती देण्यात येत आहे, असे सूत्रांनी सांगितले.
फेरतपासणीची मागणी
सीबीएसई 12वीच्या 4 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पेपरच्या फेरतपासणीची मागणी केली आहे. त्यांना पेपर उपलब्घ करून देण्यात येत आहे, अशी माहितीदेखील प्रधान यांनी दिली. आतापर्यंत 11 लाख उत्तरपत्रिका तपासल्या आहेत.
सीबीआयने तपासले मोटेगावकरचे लॉकर्स
‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात मोठय़ा प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले आहेत. त्यादृष्टीने सीबीआयने तपासाची चव्रे फिरवली आहेत. मुख्य संशयित आरोपी शिवराज मोटेगांवकर आणि त्याच्या कुटुंबीयांशी संबंधित बँक खाती आणि लॉकर्सची तपासणी सीबीआयने सुरू केली आहे. या लॉकर्समध्ये रोख रक्कम, बेकायदेशीर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि बँक व्यवहारांच्या माहितीचा तपास केला जात आहे. त्यातून मोठे घबाड हाती लागण्याची दाट शक्यता आहे.





























































