
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
एअर इंडियाच्या चेक-इन सॉफ्टवेअरमध्ये शनिवारी सकाळी झालेला बिघाड रविवारी पूर्ण ठीक झाला नव्हता. त्यामुळे आज एअरलाइन्सची तब्बल 137 उड्डाणे खूप विलंबाने होत होती. कंपनीच्या प्रवक्त्याने याबाबत बोलताना सांगितले की, हा विलंब जास्त नसला तरी सरासरी सव्वातीन तासांचा असेल. एअर इंडियाच्या या सॉफ्टवेअर बिघाडामुळे शनिवारी जगभरातल्या हजारो प्रवाशांना खूपच त्रास झाला होता. एअर इंडियाच्या पीएसएस सॉफ्टवेअरमध्ये काही तांत्रिक गडबड झाली आणि शनिवारी पहाटे साडेतीन वाजल्यापासून ते सकाळी पावणेनऊ वाजेपर्यंत हे सॉफ्टवेअर पूर्णपणे ठप्प झाले होते. या सॉफ्टवेअरद्वारेच ही विमान कंपनी चेक-इन, बॅग व्यवस्था आणि आरक्षण सुविधा सांभाळली जाते. तेच बंद झाल्यामुळे शनिवारी 149 विमानांना विलंब झाला.





























































