भूमिपुत्रांना साडेबारा टक्के योजनेंतर्गत भूखंडांचे वाटप करण्यासाठी आढेवेढे घेणाऱ्या सिडकोने सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली ऐरोलीतील 70 एकरचा भूखंड लाडक्या बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे. खोके सरकारचा हा डाव हाणून पाडण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज सिडकोच्या बेलापूर येथील मुख्यालयावर धडक देण्यात आली. हे आंदोलन शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली छेडले गेले. हा निर्णय रद्द झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शिवसेनेच्या वतीने सिडको प्रशासनाला देण्यात आला.
राज्यात खोके सरकार सत्तारुढ झाल्यानंतर सिडकोने भूखंड विक्रीचा धडाका लावला आहे. नवी मुंबई शहर प्रकल्पग्रस्तांच्या त्यागावर उभे राहिले आहे. प्रकल्पग्रस्तांना भूसंपादन झालेल्या जागेच्या बदल्यात साडेबारा टक्के योजनेंतर्गत भूखंडाचे वाटप केले जाते. या योजनेतील हजारो भूखंडांचे वाटप अद्याप झालेले नाही. जर प्रकल्पग्रस्तांनी साडेबारा टक्के योजनेतील भूखंडासाठी अर्ज केला तर भूखंड शिल्लक नाहीत, असा कांगावा सिडकोच्या माध्यमातून केला जातो. मात्र बिल्डरच्या घशात घालण्यासाठी इतका मोठा भूखंड मोठ्या तत्परतेने उपलब्ध केला जात आहे. यावर माजी खासदार राजन विचारे यांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली. विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी आज सिडकोवर धडक दिली. यावेळी शिवसैनिकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे बेलापूरचा परिसर दणाणून गेला.
या आंदोलनामध्ये शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, प्रकाश पाटील, मनोज इसवे, सुमित्र कडू, रामदास पाटील, सूर्यकांत मढवी, ज्येष्ठ माजी नगरसेवक एम. के. मढवी, उपजिल्हा संघटक वैशाली घोरपडे, सुषमा भोईर, संपर्कप्रमुख योगेश तांडेल, शहरप्रमुख काशिनाथ पवार, प्रवीण म्हात्रे, महानगरप्रमुख सोमनाथ वास्कर, विजयानंद माने, गुरुनाथ पाटील, सदानंद शिर्के, उपशहरप्रमुख सतीश रामाणे, समीर बागवान, महेश कोटीवाले, राजेश पोसम, राकेश महामूनकर, विनोद मुके, प्रमोद शिंदे, रतन मांडवे, हरिश इंगवले, शिवाजी महाडिक, शत्रुघ्न पाटील, मधुकर राऊत, अमित भुमकर, शिवम ठाकूर, प्रवीण जाधव, यतीन देशमुख, संदीप तांडेल आदी उपस्थित होते.
सिडकोने दबावाला बळी पडू नये
खारघरमध्येही सुमारे शंभर एकराच्या भूखंडाचा झोल करण्यात आला आहे. ऐरोलीमध्ये हजारो कोटी रुपये किंमतीचा भूखंड लाडक्या बिल्डरच्या घशात घालण्यासाठी जीवाचा आटापिटा सुरू आहे. हा घोटाळा सिडकोच्या कर्मचारी संघटनेने उघडकीस आणला असून त्यांचे धाडस कौतुकास्पद आहे. सिडको प्रशासनाने केंद्र आणि राज्य सरकारच्या दबावाला बळी पडून हे भूखंड लाडक्या बिल्डरांच्या घशात घालू नयेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही राजन विचारे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना दिला आहे.
भूखंड लाटायचे राहिले म्हणून निवडणुका पुढे ढकलल्या
खोके सरकारने महाराष्ट्राचे वाटोळे चालवले आहे. कडकी लागली की लाडक्या बिल्डरांच्या खशात भूखंड घातले जात आहेत. महिलांवर होत असलेल्या अत्यांचारांकडे यांना पाहायला वेळ नाही. हे दिवसरात्र फक्त भूखंड शोधण्याचे काम करीत आहेत. याच कामात व्यस्त असल्यामुळे राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खोके सरकारने राज्य डबघाईला आणले आहे. भूखंड लाटायचे बाकी राहिल्यामुळे यांनी निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, अशीही टीका यावेळी राजन विचारे यांनी केली.