
सामना प्रतिनिधी, मुंबई
टीव्ही डिस्ट्रीब्युशन क्षेत्रात उतरलेल्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता एअरटेल डिजिटल टीव्हीने कंबर कसली आहे. एअरटेलची डीटीएच बिझनेस सेवा आणि डिश टीव्ही एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. डिश टिव्हीमध्ये सुनील मित्तल यांची एअरटेल डिजिटल टीव्ही विलीन झाल्यानंतर तयार होणारी नवीन कंपनी ही जगातील सर्वात मोठी डिस्ट्रीब्युशन कंपनी ठरेल. नव्या कंपनीकडे 3.8 कोटी सबक्रायबर आणि देशातील डीटीएच मार्केटचा 61 टक्के हिस्सा असेल.
गेल्यावर्षी मार्च महिन्यात डिश टीव्हीने व्हिडियोकॉनसोबत विलीनीकरण केले होते. देशातील डीटीएच मार्केटमध्ये विलीन होणारी ही पहिली कंपनी होती. याआधी एअरटेलने डीटीएच बिझनेसला टाटा स्काय कंपनीला विकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो यशस्वी झाला नाही.
- सध्या टीव्ही मार्केटमध्ये एकूण 6 डीटीएच ऑपरेटर आहेत, त्यामध्ये सहा पेमेंटवर आधारित सर्विस आणि एक फ्री सर्विस आहे.
- सप्टेंबर 2018च्या ट्रायच्या अहवालानुसार, डीटीएच मार्केटमध्ये 31 टक्के भागीदारीसह डिश टीव्ही सर्वात आघाडीवर आहे. त्याखालोखाल टाटा स्कायकडे 27 टक्के आणि एअरटेल डिजिटल टीव्ही 24 टक्के भागीदारी आहे.
- 31 डिसेंबर 2018 रोजी संपलेल्या तिमाहीत डिश टिव्हीजवळ 2.36 कोटी सबक्रायबर होते, तर उत्पन्न 1517 कोटी होते.
























































