
सामना प्रतिनिधी । मुंबई
बहुप्रतीक्षित असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ (केबीसी) च्या 11 व्या मोसमाची खास ट्यून लोकप्रिय संगीतकार अजय-अतुल या जोडीने साकारली आहे. केबीसीची ट्यून अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ती फक्त एक ट्युनच नाही तर तिच्याशी लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. आता या धूनल अजय-अतुल या जोडीचा सांगीतिक स्पर्श लागणार आहे. संगीतकार द्वयी अजय-अतुल यांनी या विशेष ट्यूनला आपला खास सांगीतिक स्पर्श दिला आहे. अपवादात्मक प्रतिभावंत अशी ही द्वयी केवळ लोकसंगीतातील त्यांच्या अनुकरणीय ज्ञानाबद्दलच नाही तर वाद्यांमधील बारकावे आणि अनोखे वाद्यवादन यासाठीही प्रसिद्ध आहे. यासंदर्भात संगीतकार अजय-अतुल म्हणाले, ‘कौन बनेगा करोडपती’सारख्या खास शोबरोबर जोडले जाणे हा आमच्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. जेव्हा केबीसी टीमने आमच्याशी संपर्क साधला तेव्हा नवे आव्हान उभे टाकले. कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनावर कोरल्या गेलेल्या सुरावटीवर आम्ही कितपत झेप घेऊ शकू, हा प्रश्न होता. पण या ट्यूनमध्ये नवीन रंगत आणणारी सुरावट आणि वाद्यसंगीत वापरण्यात यशस्वी ठरलो. ही रचनाही मूळ रचनेसारखीच प्रेक्षकांच्या मनाच्या तारा छेडेल.
























































