
‘‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अतिशय उत्तमपणे काम करणाऱया महाविकास आघाडीच्या सरकारला गद्दारांनी गालबोट लावले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. त्याचा बदला चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकांत घ्या. गद्दारांना धडा शिकविण्याची हीच वेळ आहे,’’ असा घणाघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात अजित पवार बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहरात भाजपचे काहीच अस्तित्व नव्हते. दोन-चारशिवाय भाजपचे नगरसेवक निवडून आले नव्हते. मात्र, फोडाफोडीच्या राजकारणातून भाजपने पक्ष वाढविला. पक्षांतरबंदी कायद्यालाही तिलांजली दिली.’’
‘‘नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे चार उमेदवार निवडून आले. त्यामुळे भाजप-शिंदे गटाला त्यांची ताकद कळली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. शहरात कोयता गँग आली आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांना कारवाई करता येत नाही. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या रॅलीवर दगड मारले. महिला आमदारांवर हल्ला होत आहे. पत्रकाराचा खून केला. याचा जनतेने विचार केला पाहिजे,’’ असेही पवार म्हणाले.
‘‘महापालिका निवडणुकीत राजकीय ताकदीप्रमाणे जागावाटप केले जाईल; पण आताच्या काळात आपल्या मतांची विभागणी होणे परवडणारे नाही. एक-एक मत महत्त्वाचे आहे. गाफील राहू नका, गैरसमज करू नका. शिवसेनाप्रमुखांनी उभी केलेली शिवसेना आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे जनतेने वेळोवेळी सिद्ध केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अतिशय उत्तमपणे काम करणाऱया महाविकास आघाडीच्या सरकारला गद्दारांनी गालबोट लावले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. त्याचा बदला चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकांमध्ये घ्या. गद्दारांना धडा शिकविण्याची हीच वेळ आहे,’’ असेही पवार यांनी सांगितले.
केवळ मतांसाठी भाजपने आजारी आमदारांच्या आरोग्याचा विचार केला नाही
अजित पवार म्हणाले, ‘‘आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक हे दोघेही गंभीर आजारी असताना भाजपने राज्यसभा आणि विधानपरिषदेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी रुग्णवाहिका करून त्यांना मुंबईला मतदानासाठी नेले. एवढे काय घडले होते? एक-दोन मते कमी झाली असती तर काही आकाश पडले नसते. दगदग दोघांना सहन होत नव्हती; पण पक्षाकरिता गप्प बसले. एवढा मनाचा मोठेपणा, दिलदारपणा या दोन आमदारांनी दाखविला. मात्र, निवडणुकीपेक्षा तुमचा जीव, तुमचे आरोग्य महत्त्वाचे आहे, हे सांगायला पाहिजे होते. मात्र, या स्वार्थी लोकांनी ते सांगितले नाही.’’



























































