नामांतराचा विषय तिन्ही पक्ष एकत्र बसून सोडवू! अजित पवार यांची भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालवत आहोत. तीनही पक्ष एकत्र येऊन चर्चा केल्यानंतरच एखादा निर्णय घेतात. औरंगाबादच्या नामांतराबाबतही तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्पष्ट केली.

संभाजीनगर नामांतराबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, नामांतराबाबत महाविकास आघाडी याबाबत एकत्र बसून चर्चा करून मार्ग काढेल. आपण अनेक विमानतळांना मान्यवरांची नावे दिलेली पाहिली आहेत. उत्तर प्रदेशात मायावती आल्यानंतर त्यांनी अनेक जिह्यांची, शहरांची नावे बदलून टाकली. लोकशाहीत जे निवडून येतात त्यांना बहुमताच्या जोरावर काही अधिकार असतात. त्या अधिकाराचा वापर कसा करावा यावर ज्याने त्याने आत्मचिंतन करून निर्णय घ्यावा. काहींचे हे मुद्दे बरीच वर्षे डोक्यात होते. त्या वेळी ते पुढे रेटता आले नाहीत, तेव्हा आता त्यांना वाटतंय हा प्रश्न सुटावा. पण हा प्रश्न सुटत असताना महाविकास आघाडी टिकावी, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. योग्य तो मार्ग निघावा. विकासकामांना महत्त्व द्यावं, ही भूमिका शरद पवारांची आहे. आम्ही याच भूमिकेचे समर्थन करून पुढे जात आहोत, असे अजित पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचा कल आघाडीत लढण्याचा

मुंबई महापालिका राष्ट्रवादी स्वबळावर लढणार का, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादीची भूमिका मित्रपक्षांबरोबर आघाडी करून पुढे जायची आहे. याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार शरद पवार यांना आहे. मला विचाराल तर आघाडी करावी, मतांची विभागणी होऊ नये या मताचा मी आहे. आघाडी न केल्यास ना तुला, ना मला, ना तिसऱ्याला असं होऊ शकतं. त्यामुळेच आघाडीबाबत मी सकारात्मक आहे. आम्ही याबाबत बाळासाहेब थोरातांशी व भाई जगताप यांच्याशी चर्चा करू. महाविकास आघाडीला कुठे अडचण न येता स्थानिक स्वराज्य संस्थेत यश मिळावे असा आमचा प्रयत्न असेल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

तिन्ही पक्ष एकत्र लढणार – नवाब मलिक

मुंबई महानगर पालिका निवडणूक शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र लढवावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवत्ते नवाब मलिक यांनी आज स्पष्ट केले.