मुद्दा – जगण्याचा श्वास ‘वडील’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सारं घर रडून मोकळं होतं

आईच्या कुशीवर,

पण रात्री आभाळ रिकामं होतं ते फक्त वडिलांच्या उशीवर!

‘वडील’ म्हणजे कुतूहलाचं एक नाव आणि सुखी-समाधानाच्या आयुष्याला मिळालेला एक परीस! खरं तर वडील त्यांचा प्रत्येक क्षण आपल्या मुलामुलींसाठी देतात. आनंदाच्या, दुःखाच्या प्रसंगी साथसुद्धा देतात. प्रेरणा तर वडिलांना बघताच मिळते. मग का त्यांना गरज असताना आजच्या पिढीच्या मुलांचे क्षण व्यस्त असतात? आनंदाचे तर सोडाच, दुःखाच्या प्रसंगी का त्यांची साथ द्यायला आजच्या पिढीचे हात नसतात? जीवन जगण्याविषयी प्रश्नचिन्ह तर आहेच, पण प्रत्येकाची प्रेरणा असलेले आपले ‘वडील’ असल्यानंतर त्यांच्याही बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण होतं. मग जे आपली प्रेरणा आहेत, त्यांच्यासाठी या गोष्टी होत असतील तर नवलच नाही का? ‘वडील’ प्रत्येक मुलाच्या शब्दांत बसण्याइतके छोटेही नाहीत आणि त्यांना शब्दांत बसवण्याइतका कोणता मुलगाही मोठा नाही! पण आधार नसलेल्या हाताला आधार कुणी द्यावा आणि वडील म्हातारे झाले म्हणून त्यांना वृद्धाश्रमात का न्यावे? आई-वडिलांच्या जिवावर मुलं शिकतात, मोठी होतात, कालांतराने पुढे जातात आणि मग त्यांनाच म्हणतात, तुमच्यापेक्षा आम्ही कर्तृत्ववान आहोत! स्वतःच्या रक्ताचं पाणी करून आपल्या मुलांची तहान आई-वडील भागवतात. दिवसभराच्या उन्हाला शरीराचा सोबती मानून दिस-दिस राबतात. कामावरून घरी जाताना वडील आपल्या चिमुकल्याच्या आलिंगनाची आस धरून जगतात. लाडक्या लेकरासाठी  ATM भरत राहावं म्हणून रात्र-रात्र जागून काम करतात. मुलांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी स्वतःची स्वप्नं विसरून जातात. डोळ्यात न दाखवताही आभाळाएवढं प्रेम करून ‘बाप नावाचा राजामाणूस’ होतात.

जगात वडीलच एकमेव व्यक्तिमत्त्व असे होते की, ज्यांच्या सावलीत असंख्य मुलामुलींनी राज्य केलं. आपल्या मुलीसाठी तर ते नेहमी जादूमयसारखे झाले. तिच्या लग्नाच्या दिवशी स्वतःचे अश्रू लपवत फिरले. आपल्या मुलाचं भविष्य चांगलं असावं म्हणून वडिलांना कधी कधी झोपसुद्धा लागली नाही. वडील देव नाही, पण देवापेक्षाही फार ग्रेट होते. कारण देव तर सुख-दुःखं दोन्ही देतो, पण वडिलांनी तर नेहमी फक्त सुखच दिले. आजही ते दिवस, तो फरक आठवतो. लहानपणी वडील झोपताना एखादी गोष्ट सांगून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जायचे. वीस रुपये वाचावेत म्हणून वडील वीस मिनिटं चालायचे आणि आपल्या मुलाची वीस मिनिटं वाचावीत म्हणून वीस रुपये मुलं आनंदाने खर्च करायचे. वडील असेपर्यंत परिस्थितीचे काटे कधीच कुठल्या मुलांपर्यंत पोहोचले नाहीत. वडिलांचा एक हात उशाला असेपर्यंत गादीचीसुद्धा गरज पडली नाही. यशाच्या प्रत्येक पायरीचा दगड वडील होते. पण त्याशिवाय ही इमारत उभी राहिली नाही. आकाशालाही लाजवेल अशी उंची आणि आभाळालाही लाजवेल असं कर्तृत्व प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलासाठी उभारलं! आम्ही स्वतःच्या जिवावर जगतो हा आजच्या पिढीतील मुलांचा भ्रम आहे. खरं तर वडीलच प्रत्येक मुलाला जगवतात आणि कष्टानं खायला शिकवतात! शेवटी एकच, वडील असेपर्यंत त्यांना जपा. मग नंतर फक्त भास होत राहतो त्यांचा, पण स्पर्श नाही!

>> आकाश दीपक महालपुरे ([email protected])