उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह, क्वारंटाइन होत केलं ट्वीट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
akhilesh-yadav

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. अखिलेश यांनी बुधवारी सकाळी ट्विट करून याची माहिती दिली. पॉझिटिव्ह आल्यानंतर अखिलेश यादव यांनी स्वत:चे विलगिकरण करून घेतलं आहे.

समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. ‘आताच माझा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं आहे आणि घरातच उपचार सुरू करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसात जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्या सर्वांना विनम्रतेने आग्रह करतो की चाचणी करून घ्या. तसेच काही दिवस विलगिकरण करून घेत स्वत: इतर कुणाच्या संपर्कात येऊ नका.’, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं.

महत्त्वाची बाब म्हणजे अखिलेश यादव यांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात हजेरी लावली होती. इथे त्यांनी आपले समर्थक आणि अनेक साधु-संतांसोबत भेट घेतली होती.

हरिद्वारमध्ये अखिलेश यादव यांनी आखाडा परिषदचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि महाराज यांची भेट घेतली होती, नरेंद्र गिरि स्वत: कोरोना पॉझिटिव्ह आले होते. आता दोन दिवसांनी खुद्द अखिलेश यादव देखील कोरोनाग्रस्त झाले आहेत. अखिलेश नरेंद्र गिरि महाराजांना सकाळी भेटले होते आणि तोपर्यंत महाराजांचा चाचणी अहवाल प्राप्त झाला नव्हता. त्यामुळे ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशात कोरोनाचा प्रादूर्भाव वेगानं वाढत असून काल एकाच दिवसात 18 हजार रुग्ण आढळले आहेत.