अक्कलकोटमध्ये तीन दिवसांपासून तुफान पाऊस, खरिपाची पिके पाण्यात; उभा ऊस झाला आडवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अक्कलकोट तालुक्यात सलग तीन दिवसांपासून पडणाऱया तुफान पावसामुळे पुन्हा एकदा नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. उरलेसुरले काढणीला आलेले उडीद, मूग या पावसाने जमीनदोस्त झाले आहेत. उभा ऊस आडवा झाला आहे. त्यामुळे महसूल पंचनामे ग्राह्य धरून पीकविमा द्यावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

अक्कलकोट तालुक्यात यंदा पावसाने धुमाकूळ घातला आहे. पिकांनी उन्हाची ऊबदारताच यंदा अनुभवली नाही. दररोज वादळी वाऱयासह पावसामुळे शेतातील पिके पाण्यातच कुजली आहेत. अशा स्थितीत बुधवारपासून सलग तीन दिवसांपासून तालुक्यात पाऊस सुरू आहे. त्यामुळे खरिपाच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. उभा ऊस आडवा होऊन पडला आहे.

हंजगी व जेऊर मंडळात एका रात्रीत 48 मिलिमीटर पाऊस झाला आहे. बुधवारी तालुक्यात रात्री सुरू झालेला पाऊस शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. पावसाबरोबर वाऱयाने झोडपत पिकाची नासाडी झाली आहे. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले, वीजपुरवठाही खंडित झाला आहे. पावसामुळे जेऊर मंडळातील शेतशिवारात सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. काही भागांत शेतात काढून ठेवलेले उडीद, मूग, सोयाबीन ही पिके पाण्यात गेली आहेत.