सावकारांच्या छळाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, दोन सावकारांविरोधात गुन्हा दाखल

अकोला जिल्ह्यातील दिग्रस बुद्रुक येथील शेतकरी गोपाल पाटकहेडे यांनी खासगी सावकारांकडून सुरू असलेल्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. एक लाख रुपयांचे कर्ज व्याजासह फेडूनही सावकारांनी सात ते आठ लाख रुपये अतिरिक्त मागणी केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या रकमेसाठी त्यांच्या शेतीवर बळजबरीने ताबा घेण्याची धमकी सावकारांकडून दिली जात असल्याचेही समोर आले आहे.

आत्महत्येपूर्वी गोपाळ यांनी मोबाईलवर एक व्हिडीओ रेकॉर्ड केला असून त्यात त्याने संबंधित आरोपींची नावे घेतली आहेत. “ते मला जगू देत नाहीत… सतत दबाव टाकत आहेत, म्हणून मी माझे जीवन संपवत आहे,” असे यात म्हटल्याचे समजते.

या घटनेनंतर गोपाळ यांचा भाऊ नागेश पाटकहेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाटूर पोलिसांनी राकेश गांधी आणि सचिन उर्फ बंटी खारल या सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार गोपाळ यांनी स्थानिक सावकार राकेश गांधी यांच्याकडून 20 टक्के व्याजदराने एक लाख रुपये कर्ज घेतले होते. मात्र संपूर्ण मूळ रक्कम आणि व्याज फेडूनही आरोपी सात ते आठ लाख रुपये देण्याची मागणी करत होते. दबाव आणण्यासाठी आणि धमकावण्यासाठी त्यांच्या जमिनीचा काही भाग बळजबरीने तारण म्हणून घेतल्याचे आरोप आहेत. यापैकी बेलोरा खुर्द येथील 0.40 हेक्टर जमीन आरोपींनी दबाव टाकून त्यांच्या नावावर करून घेतल्याची माहिती कुटुंबाने दिली आहे.

पाटूर पोलिस ठाण्याचे प्रभारी हनुमंत दोपेवार यांनी दोन्ही मुख्य आरोपी फरार असल्याचे सांगितले. त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. या घटनेनंतर कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. “एक लाख कर्ज घेऊन सात-आठ लाख कसे फेडायचे?” असा संतप्त सवाल कुटुंबीयांनी केला आहे. स्थानिकांनी या परिसरात अवैध सावकारीचे जाळे असून त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करत असल्याचा आरोप केला आहे.