
पेट्रोल, डिझेलचे दरात सातत्याने वाढ होत असताना इंधनाला पर्याय म्हणून चक्क पाण्यावर चालणारी बाईक अकोल्यातील चार मित्रांनी तयार केली आहे. यश जायले, मंदार कल्ले, शंतुन झाकर्डे, अभिजित धर्मे अशी या चौघांची नावे आहेत. बीएस.सीच्या दुसऱया वर्षात शिकणाऱया मुलांनी गेल्या चार वर्षांपासून डोक्यात असणारी ही भन्नाट संकल्पना लॉकडाऊनमध्ये प्रत्यक्षात साकारली.
मुलांनी जुन्या दुचाकींचे सुटे भाग वापरून बाईक तयार केली. आणि त्यावर हा प्रयोग केला. त्यांनी बाईकचे पेट्रोल टँक काढून टाकले आणि तीन- साडेतीन लिटर पाण्याचा कॅन बाईकच्या डिक्कीला जोडला. पाण्यातील घटक असलेल्या हायड्रोजनचे ऑक्सिजनच्या सहाय्याने ज्वलन करून त्याचे वायूरुपात जतन केले जाते. एका सेलमध्ये हा वायू जमा केला जातो आणि त्याद्वारे इंजिन सुरू होते आणि बाईक धावू लागते.
- बाईक तीन लीटर खाऱया पाण्यावर (टीडीएस) ताशी 40 किमीच्या वेगाने 90 किमी एवढे अंतर पार करू शकते.
सध्या बाईकमध्ये ऑटोमेटिक गेअर सिस्टीम जोडण्यावर काम सुरू - कार्बन डायॉक्साईडऐवजी पाण्याची वाफ उत्सर्जित होत असल्याने पर्यावरण संरक्षण होते.
हवाय मदतीचा हात
या प्रकल्पासाठी मुलांना मदतीची गरज आहे. आपल्या देशातील रस्त्यांवर धावू शकेल अशी परिपूर्ण बाईक लाँच करायची आहे. त्यासाठी सरकार आणि सामाजिक संस्थांकडून मदतीची अपेक्षा आहे, असे यश जायले याने दैनिक ‘सामना’ शी बोलताना सांगितले.






























































