
शहरात ‘एआयएमआयएम’चे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या प्रचारसभेत मोठा गोंधळ उडाला. गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आणि अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, मात्र सभेत उपस्थितांना समोर येण्याचे आवाहन करणाऱ्या ओवेसी यांनी ‘हे तर जनतेचे प्रेम आहे’, असे म्हणत जबाबदारी झटकली.
अकोल्यातील गडंकी भागातील झुल्फिकार अली मैदानावर रविवारी रात्री प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. सभेदरम्यान ओवेसी यांनी मंचावरून उपस्थित कार्यकर्ते व समर्थकांना जवळ येण्याचे आवाहन केल्यानंतर अचानक मोठय़ा प्रमाणात गर्दी मंचाच्या दिशेने धावू लागली. लोकांनी बॅरिकेडस्वरून उडय़ा मारत व्यासपीठापर्यंत धाव घेतली. अखेर गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
राजकीय वर्तुळात टीका, चौकशीची मागणी
सभेत झालेला गोंधळ व पोलीस लाठीचार्जवर प्रतिक्रिया देताना खासदार ओवेसी यांनी संपूर्ण प्रकाराला ‘जनतेचं प्रेम’ असे म्हणत जबाबदारी ढकलली. सभेतील सुरक्षेची जबाबदारी किंवा गर्दी नियंत्रणाबाबत त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. या प्रकाराची चौकशी करून लाठमार करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी केली आहे.
‘चार काय तुम्ही आठ मुले जन्माला घाला’
ओवेसी यांनी अमरावतीमध्ये झालेल्या सभेत आरएसएस आणि नवनीत राणा यांच्या वक्तव्याला प्रत्यत्तर दिले. मोहन भागवत म्हणतात मुलं जन्माला घाला, नवनीत राणा म्हणतात 4 मुलं जन्माला घाला. मी सांगतो तुम्ही 8 मुलं जन्माला घाला, आम्हाला त्याचं काही देणंघेणं नाही. पण तुम्ही केवळ द्वेषाचे राजकारण करत आहात.


























































