अकोल्यात मंदिराच्या शेडवर झाड कोसळून 7 भाविकांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. वादळी पावसामुळे मंदिराच्या शेडवर झाड कोसळून सातजणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी अकोला येथील बाळापूर तालुक्यातील पारस गावात घडली. शेडखाली 40हून अधिक जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह प्रशासकीय अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. मात्र पाऊस आणि वाऱयामुळे बचाव कार्यात अडथळा येत होता.

पारस गावातील बाबूजी महाराज संस्थानात सायंकाळची आरती सुरू असताना अचानक पाऊस आणि वादळीवारा सुरू झाला. त्या वेळी मंदिराला लागूनच असलेले भलेमोठे कडुलिंबाचे झाड उन्मळून मंदिराच्या शेडवर कोसळले. आरतीसाठी उपस्थित असलेले 40 ते 50 जण शेडखाली दबले गेले. त्यातील सातजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृत आणि जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू होते.