अलिबागमधील हॉटेलच्या अॅडव्हान्स बुकींगच्या नावाखाली अनेकांना गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फिरायला जाताना हल्ली पर्यटक ऑनलाईन हॉटेल बुकिंगचा पर्याय निवडतात. मात्र ऑनलाईन हॉटेल बुकिंग करताना नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे. कारण हॉटेलच्या नावाची बोगस वेबसाईट तयार करून ऍडव्हान्स बुकिंगच्या नावाखाली पैसे उकळण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अलिबागमधील नामांकित हॉटेल्सच्या नावे बोगस वेबसाईट बनवून गेल्या काही दिवसांमध्ये पर्यटकांची मोठी फसवणूक झाली आहे.

ऑनलाईन गुन्हेगार ऍडव्हान्स बुकिंगच्या नावाखाली पर्यटकांकडून पैसे उकळतात. बुकींग झालं या भ्रमात असलेले पर्यटक प्रत्यक्षात हॉटेलवर पोहोचतात तेव्हा त्यांना बुकींग झालेलंच नाहीये असं कळतं. ज्या साईटवरून त्यांनी बुकींग केलेलं असतं तशी कोणतीही वेबसाईट हॉटेलची नाहीये असं हॉटेल प्रशासनाकडून त्यांना सांगण्यात येत. पैसे वाया गेले, वेळ वाया गेला आणि मनस्ताप झाला तो वेगळा अशी प्रतिक्रिया या पर्यटकांकडून ऐकायला मिळत आहे. काही पर्यटकांनी सायबर क्राईम विभागकडे या प्रकाराबाबत ऑनलाईन तक्रार केली असून अलिबागमधल्या हॉटेलचालकांनीही पोलिसांना लेखी तक्रार दिली आहे. मात्र तरीही पर्यटकांसोबतचे हे फसवणुकीचे प्रकार सर्रासपणे सुरूच आहेत.

मुंबईतील दर्शना विचारे यांच्यासोबत देखील अशीच फसवणूक झाली. याबद्दल त्यांनी सामना ऑनलाईनला सांगितले की, सामान्यतः आपण कुठे फिरायला जायचे असल्यास मेक माय ट्रिप, ओयो यांसारख्या साईट्सवर हॉटेल बुक करतो. आम्हाला अलिबागला जायचं होतं आणि अलिबागच्या कोकोनट आयवी या हॉटेलची मला माहिती मिळाली. एका वेबसाईटवर या हॉटेलचा व्हॉट्सऍप नंबर देखील मिळाला. या नंबरवर आम्ही संवाद साधला असता. आम्हाला रूमचे फोटो पाठवण्यात आले. आम्हाला रूम आवडल्यानंतर आम्ही दोन रूम आठ हजारांत बुक केल्या होत्या. रुम बुक करण्यासाठी तुम्हाला सगळे पैसे अॅडव्हान्स भरायला लागतील असं समोरच्याने सांगितलं होतं. मात्र दर्शना यांनी फक्त 2 हजार रुपयेच अॅडव्हान्स म्हणून भरले होते.

दर्शना यांनी ‘गुगल पे’ वापरून पैसे भरले होते. पैसे भरत असताना गुगल पेवर हॉटेलचं नाव दिसत नव्हतं. असं का ? हा प्रश्न दर्शना यांनी विचारला असता समोरच्याने एक स्कॅन कोड पाठवून त्यावर आमच्या सरांचे नाव येईल तिथे तुम्ही पैसे भरू शकता असं सांगितलं होतं. दर्शना यांना थोडा संशय आल्याने त्यांनी आम्ही हॉटेलच्याच खात्यावर पैसे भरू असं ठामपणे सांगितलं. यावर समोरच्या व्यक्तीने त्यांना हॉटेलचे नाव असलेल्या खात्याचा तपशील पाठवले. दर्शना यांचे समाधान झाल्याने त्यांनी त्यावर दोन हजार रुपये पाठवले होते.

दुसऱ्या दिवशी दर्शना त्यांच्या कुटुंबासोबत अलिबागला गेल्या असता त्यांना रिसेप्शन काऊंटरवर त्यांच्या नावाने कोणतंही बुकींग नसल्याचं सांगितलं. त्यांनी नेमकं काय झालं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना कळालं की त्यांच्या प्रमाणे याआधी अनेक ग्राहकांची फसवणूक झाली आहे. अलिबागमधल्या बऱ्याच हॉटेल चालकांना असे अनुभव यापूर्वीही आल्याचे या हॉटेलच्या रिसेप्शनवरून दर्शना यांना कळाले. अलिबागमधल्या हॉटेलचालकांनी याबाबत पोलिसांत तक्रारही केली आहे. पर्यटकांचा अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यांकडे ओढा कायम असतो. त्यामुळे हॉटेल बुकिंग किंवा अन्य कोणत्याही गोष्टीसाठी ऑनलाईन बुकिंगचा पर्याय निवडताना पर्यटकांनी सावध राहणे गरजेचे आहे.