
महायुतीचे अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी आज हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला. यावेळी अलिबाग शहर हे भगवेमय झाले असून शहरातून रॅली काढण्यात आली होती. तब्बल एक किलोमीटरपर्यंत ही रॅली पोहोचली होती त्यामुळे एवढ्या गर्दीने विरोधक धास्तावले आहेत.
अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे महेंद्र दळवी यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. सकाळी अकरा वाजता सुमन क्रियेशन चाळमळा येथून महेंद्र दळवी यांची रॅली निघाली होती. यावेळी दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांना अभिवादन करीत रॅली तहसीलदार कार्यालयाकडे निघाली होती. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख विलास चावरी, सह संपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष ऍड महेश मोहिते, विजय कवळे, हजारो शिवसैनिक, भाजप, आरपीआय कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक यावेळी उपस्थित होते.
अलिबाग विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार पंडित पाटील हे विकास कामात पूर्णतः अपयशी झाले आहेत. अलिबाग मुरुडचा विकासाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच या निवडणुकीत उतरलो आहोत. अशी प्रतिक्रिया यावेळी महेंद्र दळवी यांनी दिली.


































































