
सामना प्रतिनिधी। अलिबाग
सरपंच पदाचा गैरवापर करून सार्वजनिक जागेत अतिक्रमण करून घर बांधून ते परस्पर विक्री केल्याच्या प्रकारामुळे शिरवली ग्रामपंचायतीचे शेकापचे सरंपच प्रमोद तुकाराम ठाकूर, सदस्या प्रीती प्रमोद ठाकूर व सदस्य मदन कृष्णा म्हात्रे यांना रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी अपात्र ठरविले आले आहे. त्यामुळे वीस दिवसांवर आलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना शेकापला हा मोठा झटका बसला आहे. सरपंच प्रमोद ठाकूर हे ऑक्टोबर 2017 मध्ये थेट सरपंच म्हणून शेकापकडून निवडून आले होते.
अलिबाग तालुक्यातील शिरवली येथील ग्रामस्थ शाम श्रीधर घरत व मनोज गोपाळ म्हात्रे यांनी सरपंच प्रमोद ठाकूर याच्या विरोधात तहसीलदारांकडे तक्रार केली होती. सरपंच प्रमोद ठाकूर यांनी ग्रामस्थांच्या सार्वजनिक मालकीच्या जमिनीमध्ये बेकायदा घर बांधून त्याची विक्री केल्याने त्यांना तहसिलदार कार्यालयाकडून नोटीस बजाविण्यात आली होती. तसेच दंडही आकारण्यांत आला असल्याने त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी अर्जदार शाम घरत व मनोज म्हात्रे यांनी केली होती.
विवाद अर्जावर दोन्ही बाजूने युक्तीवाद झाले. प्रमोद ठाकूर यांनी शासकीय जमिनीवर सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण केल्याचे सिध्द झाले. दरम्यान, सुनावणीत मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14 (ज) 3 नुसार व कुटुंबातील सदस्यांनी केलेलं अनधिकृत बांधकामही ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवकांचे पद रद्द करावे या सर्वोच्च न्यायालयाच्या याचिका क्र. 6832/2018 मधील आदेशाचे पालन करून जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी अर्जदार शाम घरत व मनोज म्हात्रे यांचा विवाद अर्ज मान्य करून शिरवली ग्रामपंचायतीचे सरंपच प्रमोद तुकाराम ठाकूर, ग्रामपंचायत सदस्या प्रीती प्रमोद ठाकूर व ग्रामपंचायत सदस्य मदन कृष्णा म्हात्रे यांना उर्वरीत कालावधीसाठी अपात्र घोषित केले आहे.

































































