विद्यापीठाच्या महर्षी कर्वे वसतिगृहातील मुलींचे रात्रभर आंदोलन, प्रशासनाकडून साधी विचारणाही नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमधील महर्षी कर्वे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना सध्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. काल दुपारपासून वसतिगृहात पाण्याची बोंब होती. याबाबत विचारणा करण्यासाठी वसतिगृहातील मुली वॉडर्नना भेटण्यासाठी गेल्या होत्या, मात्र वॉर्डन या मुलींना भेटल्याच नाहीत. त्यामुळे या मुलींनी रात्रभर वॉर्डनच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन केले. मात्र या आंदोलनाची विद्यापीठ प्रशासनाकडून दखलच घेण्यात आलेली नाही.

महर्षी कर्वे वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. वसतिगृहात स्वच्छतेची कामे केली जात नाहीत. तसेच वसतिगृहासाठी एकच गिझर आहे. पिण्याच्या पाण्यासाठी दोन कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र एका कुलरमधून केवळ थंडच पाणी येते. याबाबत अनेकदा तक्रार करूनही काहीच कारवाई झालेली नाही. डिसेंबर महिन्यात या विद्यार्थिनींनी रजिस्टारकडे वसतिगृहातील गैरसुविधांविषयी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार आता एप्रिल महिन्यात वसतिगृहाची पाहणी करण्यात आली. मात्र या पाहणीनंतरही विविध समस्या जैसे थेच आहेत, असा आरोप वसतिगृहात राहणाऱया विद्यार्थिनींनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी मुलींनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे केलेल्या तक्रारींची दखल घेऊन युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि शीतल शेठ देवरुखकर यांनी वसतिगृहाला भेट देऊन तेथील मुलींच्या समस्या ऐकून घेतल्या. वास्तविक त्यांच्या रास्त मागण्यांकडे चार महिन्यांपूर्वी कुलसचिवांना निवेदन दिले होते; परंतु विद्यापीठ प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्यामुळे मुलींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. परंतु युवासेनेच्या माध्यमातून सदर समस्या प्र-कुलगुरू अजय भामरे यांच्याकडे मांडल्या आहेत. वसतिगृहातील पिण्याच्या पाण्याची, गरम पाण्याची तसेच वापराच्या पाण्याची समस्या, इलेक्ट्रिसिटी समस्या, सुरक्षा रक्षक समस्या आणि स्वच्छतेची समस्या या विषयांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन भामरे यांनी युवासेनेला दिले.