
मतदार यादीतील घोटाळा, निवडणूकप्रक्रियेतील गोंधळ या विरोधात मुंबईत सर्वपक्षांकडून 1 नोव्हेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी आणि रणनीती ठरवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर या सत्याचा मोर्चाबाबत माहिती देण्यात आली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी या मोर्चाबाबत माहिती दिली.
मतदार यादीतील गोंधळ, निवडणूक प्रक्रियेतील घोटाळा या विरोधात असलेले सर्व पक्ष आणि मतदार या मोर्चात सहभागी होणार आहे. हा मोर्चा दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीट येथून निघणार आहे आणि मेट्रो सिनेमामार्गे मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ थांबेल. या मोर्चात महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते, मनसेप्रमुख राज ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, डाव्या पक्षांचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार असून ते मोर्चाला मार्गदर्शन करणार आहे. या मोर्चाला लाखोंच्या संख्येने उपस्थिती असेल, असा विश्वासही अनिल परब यांनी व्यक्त केला.
केवळ राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबतच आपले मत चोरीला गेले आहे आणि चुकीच्या पद्धतीने हे सरकार सत्तेत आले आहे, असे ज्यांना वाटते, ती जनताही या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. या मोर्चाबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. त्यांच्याकडून आवश्यक त्या सूचना घेतल्या आहेत. मोर्चाचे रुट प्रसिद्धीकरता देण्यात आले आहे. आमच्या आणि मतदारांच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. मतदारयादीतील घोळ दूर करण्यात यावे, ही प्रमुख मागणी आहे.
सर्वसामान्य मुंबईकरांचा विचार करत मोर्चा शनिवारी आयोजित करण्यात आला आहे. तसेच दुपारी 1 ते 4 या वेळेत मोर्चा होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. हा मोर्चा शांततेत पार पडणार असून या मोर्चात प्रमुख नेते मतचोरी, मतदान यादीतील घोटाळा याबाबत पुढील आंदोलनाची चर्चा करत त्याची माहिती देणार आहेत, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले.



























































