
सामना आॉनलाईन,पनवेल
गुरचरण जमीन बळकावून त्यावर हॉटेल, टायरचे दुकान तसेच कार्यालय थाटल्याचा धक्कादायक प्रकार पनवेलच्या कासळखंड ग्रामपंचायतीत उघडकीस आला आहे. शेकाप नेत्याने केलेल्या या कारनाम्याचा भंडाफोड शिवसेनेने अधिवेशनात उपस्थित केल्यानंतर सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. मात्र ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेतील सत्तेच्या जोरावर हा गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. संतापजनक म्हणजे सरकारी बाबूदेखील आर्थिक हितसंबंधांमुळे याकडे कानाडोळा करत असल्याने गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सामाजिक कार्यकर्ते योगेश जुनगरे यांनी या घोटाळय़ाचा भंडाफोड केला आहे. कासळखंडमधील रहिवासी अनिल पाटील यांनी उपसरपंच असताना 2014 मध्ये सर्व्हे नं. 85/1 या मोक्याच्या गुरचरण जमिनीवर हॉटेल, टायरचे दुकान आणि कार्यालये उभे केले आहेत. जुनगरे यांनी याचा पाठपुरावा करून तब्बल तीसहून अधिक आरटीआय दाखल केले. मात्र त्याबाबतही माहिती न देता ग्रामपंचायत प्रशासन तुम्ही अपिलात जा, असे सांगत आहे. याबाबत शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर यांनी अधिवेशनात आवाज उठवल्यानंतर सभापतींनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील व ग्रामसेवक प्रमोद काळे यांनी दहा पंचांच्या उपस्थितीत पंचनामा केला. यामध्ये हे बेकायदा बांधकाम अनिल पाटील यांच्याच नावावर असल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्यानंतरही हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जुनगरे म्हणाले.
ग्रामसेवकाचा झोलझाल
पंचनाम्यात हे बांधकाम अनिल पाटील यांनीच केले असल्याचे उघड झाले असताना ग्रामसेवक काळे यांनी पदाचा गैरवापर करत पाटील यांचे चुलते गोविंद पाटील यांच्या नावाने बनावट कागदपत्रांद्वारे असेसमेंट उतारा तयार केला, असा आरोप जुनगरे यांनी केला आहे.
सीएसआर फंड खासगी खात्यावर
अनिल पाटील यांची पत्नी माधुरी पाटील या विद्यमान सरपंच आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी नवखार लॉजिस्टिक कंपनीकडून घेतलेला कोटय़वधींचा सीएसआर फंड शाळा किंवा ग्रामपंचायतीच्या खात्यावर न घेता थेट अनिल पाटील यांचे भाऊ किरण पाटील यांच्या खात्यावर वळविण्यात आल्याचा दावा योगेश जुनगरे यांनी केला आहे.































































