
अमरावती येथून जवळच असलेला रेवसा येथील पेढी नदीच्या पुरात 4 जण वाहून गेल्याची घटना 2 तारखेच्या रात्री 11 वाजता घडली. यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून 2 जण अद्याप बेपत्ता आहे. तर एक जण झाडाला अडकल्यामुळे बचावला आहे.
रेवसा गावाजवळील पेढी नदी वाहते. गेल्या दोन दिवसापासून पाऊस सुरु असल्यामुळे पेढी नदीला पूर आला आहे. काल रात्री आलेल्या पावसामुळे पेढी नदीचा पूर वाढला. त्याचवेळी रेवसा शेजारी असलेला आमला गावातील 4 जण रेवसावरुन आमला गावाकडे निघाले. मध्येच पेढी नदी असल्यामुळे या चारही जणांना पुराच्या पाण्याचा अंदाज आला नाही. रात्री 11 वाजताच्या दरम्यान विनायक कोरे, सतीस भुजाडे, पद्माकर वानखडे व अंकुश सगणे, पुराच्या पाण्यातून रस्ता पार करीत असतांनाच पाण्याचा ओढ वाढला व हे चौघेही जण पुराच्या पाण्यात वाहून गेले.
चौघापैकी विनायक कोरे यांनी नदीकाठावर असलेल्या झाडाला पकडले. त्यामुळे ते बचावले, मात्र इतर दोघेही जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. यावेळी अंकुश सगणेचा मृतदेह 500 मीटर अंतरावर आढळुन आला. तर इतर दोन जण अद्यापही बेपत्ता आहेत. दरम्यान घटनेची माहिती प्रशासकीय अधिकार्याला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी रेस्क्यू पथकाच्या मदतीने इतर दोघांचे मृतदेह शोधण्याचा प्ऱयत्न चालविला आहे. अद्यापर्यंत इतर दोघांचे मृतदेह सापडले नव्हते.




























































