
अमरावतीतील केमिस्ट उमेश कोल्हे निर्घृण हत्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने आज राज्यातील 13 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात एनआयएच्या पथकाने फोन, मेमरीकार्ड, सिमकार्ड अशी डिजिटल उपकरणे, द्वेष पसरवणारी कागदपत्रे तसेच इतर संशयास्पद कागदपत्रांसह अनेक चाकू जप्त केले.
भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे समर्थन केल्यामुळे अमरावतीचे उमेश कोल्हे यांची 21 जूनला रात्री गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. सुरुवातीला हे प्रकरण दरोड्याचे असल्याचे भासवण्यात आले. मात्र, पोलीस तपासात शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळेच कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर एनआयएने या प्रकरणाचा तपास हाती घेत 2 जुलैपासून हत्येचा तपास सुरू केला. या प्रकरणी कोल्हे यांच्या मित्रासह सात जणांना अटक करण्यात आली असून आठवा आरोपी शमीम अहमद याचा शोध सुरू आहे.
उदयपूर हत्याप्रकरणात खाटिकाला अटक
उदयपूरमधील कन्हैयालाल हत्या प्रकरणात मंगळवारी रात्री उशिरा एनआयएने एका खाटिकाला अटक केली. वासिम अली असे या खाटिकाचे नाव असून त्याचे दुकान कन्हैयालाल याच्या दुकानासमोर आहे. कन्हैयालाल याच्या हालचाली तसेच त्याच्यावर प्रत्यक्ष हल्ला झाला त्यावेळी पाळत ठेवण्याचे काम त्याने पार पाडले. आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 12 जुलैपर्यंत एनआयएची कोठडी सुनावली.






























































