अ‍ॅमेझॉनने अमेरिकेत ड्रोनने केली स्मार्टफोनची डिलिव्हरी

अ‍ॅमेझॉनने ड्रोनद्वारे स्मार्टफोनची डिलिव्हरी करायला सुरुवात केली आहे. कंपनीने याची सुरुवात अमेरिकेतील काही भागांतून केली आहे. अवघ्या 60 मिनिटांत फोनची डिलिव्हरी केली जात असल्याचे अ‍ॅमेझॉनने म्हटले आहे. हिंदुस्थानात अ‍ॅमेझॉन ड्रोनद्वारे स्मार्टफोनची डिलिव्हरी करणार का? यासंबंधी अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही. अ‍ॅमेझॉन आयफोन, सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन, अ‍ॅपल एअरटॅग, एअरपॉड, रिंग डोअरबेल यांसारख्या गॅझेट्सला ड्रोनद्वारे होम डिलिव्हरी करत आहे.

अ‍ॅमेझॉनने केवळ अमेरिकेत आतापर्यंत 60 हजारांहून अधिक उत्पादने ड्रोनद्वारे घरी पोहोचवली आहेत. ऑर्डर बुक करताच ग्राहकांना ड्रोनद्वारे डिलिव्हरीचा पर्याय मिळतो. यासाठी काही अटीसुद्धा ठेवल्या आहेत. ऑर्डर केले जाणाऱ्या सामानाचे वजन 2 किलोपेक्षा कमी असायला हवे. तसेच यासाठी ग्राहकांना 430 रुपये जास्तीचे मोजावे लागत आहेत.