निवडणुकांचा सेल संपला अन् आता खिसा कापणीचा ‘महासेल’ सुरू; इंधन दरवाढीवरून अंबादास दानवेंचा केंद्र सरकारवर घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर इंधन दरांमध्ये अखेर मोठी वाढ करण्यात आली असून, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 3 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार असून, किचनपासून ऑफिसपर्यंतच्या सर्वच बजेटवर याचा थेट परिणाम होणार आहे. या दरवाढीवरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व विधान परिषदेतील आमदार अंबादास दानवे  यांनी केंद्र सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. निवडणुकांचा ‘सेल’ संपला असून आता खिसा कापणीचा ‘महासेल’ सुरू झाला आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’च्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, की, निवडणुका संपेपर्यंत सरकारने जे ‘दरबॉम्ब’ आपल्या खिशात लपवून ठेवले होते, ते आता थेट जनतेच्या खिशावर पडू लागले आहेत. पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असताना, सरकार मात्र “कुठेही टंचाई नाही” असे आपले जुनेच रेकॉर्ड वाजवत असल्याचा टोला त्यांनी लगावला. लोक पंपावर पेट्रोल घेण्यासाठी उभे आहेत ते महागाईचा महोत्सव साजरा करण्यासाठी नाही, असेही दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये असंतोष पसरला असून विरोधकांनी आता या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे.