
नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या वादातून अंबरनाथच्या बुवापाडा परिसरात आज भाजप आणि शिंदे गटात रक्तरंजित राडा झाला. भाजप उमेदवाराच्या भावावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्याने कोयत्याने हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात सत्यम तेलंगे याच्या हातावर, पाठीवर गंभीर वार झाले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात आरोपी साहिल वडणेरे आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यातील सत्ताधारी महायुतीतील बेबनाव सातत्याने समोर येत आहे. अनेक ठिकाणी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. सांगोला येथे शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाजप म्हणजे अबलेवर बलात्कार करणारा पक्ष असल्याची बोचरी टीका केली होती. त्यानंतर ठाण्यात बीएसयूपी घरांच्या स्टॅम्प डय़ुटी सवलतीच्या श्रेयवादातून भाजप आणि शिंदे गटाने बॅनरबाजी केली होती. हा वाद इतका टोकाला गेला की, भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी शिंदे गटाचे पदाधिकारी महेश लहाने आणि हरीश महाडिक यांना कानफटवले होते. आता तर हा वाद रक्तपातापर्यंत आला आहे.
भाजप कार्यकर्त्यांमध्ये शिंदे गटाविरुद्ध संताप
अंबरनाथमध्ये बुधवारी सायंकाळी प्रभाग पाचमध्ये भाजपचे उमेदवार प्रजेश तेलंगे यांचा भाऊ सत्यम तेलंगे याच्यावर शिंदे गटाचा कार्यकर्ता साहिल वडणेरे याने कोयत्याने हल्ला केला. शिंदे गटाचे उमेदवार शैलेश भोईर यांच्याविरोधात प्रचार करू नको, नाही तर तुला मारून टाकू, अशी धमकीही वडणेरे याने सत्यमला दिली. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या घटनेमुळे भाजप कार्यकर्त्यांत शिंदे गटाविरुद्ध प्रचंड संताप उफाळला आहे.



























































