अखेर प्रेयसीमुळे सापडला कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीतील वॉण्टेड आरोपी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । मुंबई

22 कोटी 65 लाख रुपयांच्या फसवणुकीतला आरोपी तसेच 17 चेक बाऊन्सच्या केसमध्ये शिक्षा ठोठावल्यानंतरही गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देत फिरणाऱ्या आरोपीला अखेर अंबोली पोलिसांनी शोधून काढले. पाचगणी येथे जाऊन लपलेल्या सायरस नौशिरवान कात्रक (52) याला बेड्या ठोकल्या आहेत. प्रेयसीमुळे पोलिसांना कात्रकची माहिती मिळाली आणि त्याच्यापर्यंत पोहचता आले.

सायरस कात्रकने 22 कोटी 65 लाखांची फसवणूक केल्याची तसेच 17 चेक बाऊन्सच्या केसमध्ये शिक्षा लागूनही मोकाट फिरत असल्याची तक्रार संजय मेहता यांनी अंबोली पोलीस ठाण्यात दिली होती. याची दखल घेत वरिष्ठांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रवींद्र कळमकर व पथकाने कात्रकचा शोध सुरू केला. पोलिसांना कात्रकच्या प्रेयसीचा मोबाईल नंबर मिळाला. त्याआधारे तांत्रिक बाबींचा अभ्यास केल्यानंतर कात्रकचा पत्ता शोधून काढला. तो मीरा रोड येथे राहत असल्याचे समजताच पोलिसांनी त्या परिसरातील सोसायट्या, फेरीवाले यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा कात्रक हा साजिद खान या नावाने वेषांतर करून युनिक सिग्नेचर इमारतीत राहत असल्याची पक्की खबर मिळाली, पण तेथे धडकण्याआधीच तो सटकला होता.

पाचगणीत जाऊन लपला
मीरा रोडमध्ये पोलीस शोधत असल्याची माहिती मिळताच कात्रक याने पाचगणी गाठली. तेथे जे. के. मॉटेल येथे लपून राहत असल्याची कळताच पोलिसांनी तेथे जाऊन कात्रकच्या मुसक्या आवळल्या.