
सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन
व्यापारासाठी दिलेला विशेष प्राधान्य दर्जा अमेरिकेकडून काढून घेण्यात आला असून, यामुळे हिंदुस्थानला आर्थिक धक्का बसला आहे. या निर्णयामुळे हिंदुस्थानातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या अनेक वस्तूंवरील कर सवलत रद्द होणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापाराला फटका बसण्याची शक्यता आहे.
जनरलाइज्ड सिस्टम ऑफ प्रेफरन्सेस (जीएसपी) अंतर्गत अमेरिकेने हिंदुस्थानला व्यापारात विशेष दर्जा दिला होता. हिंदुस्थानप्रमाणेच तुर्कीचाही हा दर्जा काढून घेतला जात असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकी उत्पादनांवर हिंदुस्थानात मोठ्या प्रमाणावर कर आकारला जात असल्याचे ट्रम्प यांनी अमेरिकन काँग्रेस सदस्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. अमेरिकन उत्पादनांना हिंदुस्थानी बाजारपेठांमध्ये समान न्याय आणि योग्य संधी मिळत नाही. याबाबत हिंदुस्थान सरकारबरोबर अनेकदा चर्चा केली; पण हमी मिळाली नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.



























































