अमेरिका हादरली… निवडणुकीला गालबोट, ट्रम्प यांच्यावर भरसभेत गोळ्या झाडल्या

अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि यंदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भरप्रचारसभेत जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने अमेरिका हादरली आहे. ट्रम्प यांच्यावर पाच गोळय़ा झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी कानाला लागली तर एक गोळी डोक्याच्या अगदी जवळून गेली. इंचभर अंतरावर ट्रम्प यांनी मृत्यू पाहिला. हल्ल्यात ट्रम्प यांचे प्राण थोडक्यात बचावले असून रक्तबंबाळ अवस्थेतही ते वज्रमूठ उंचावून घोषणा देत होते. दरम्यान, या हल्ल्यात एक जण ठार झाला असून सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी हल्लेखोराला ठार मारले आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पेनसिल्वेनियातील बटलर शहरात सभा होती. या सभेत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. अमेरिकी प्रमाणवेळेनुसार शनिवारी सायंकाळी साडेसहा तर हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार रविवारी पहाटे 4 वाजता ही घटना घडली. ट्रम्प व्यासपीठावर येऊन बोलत असतानाच त्यांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला लागली आणि मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांच्या आजुबाजूला असलेल्या अंगरक्षक व सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी प्रसंगावधान दाखवत ट्रम्प यांच्या भोवती सुरक्षा कडे केले व सुरक्षित बाहेर नेले. त्यांना पीट्सबर्ग येथील रुग्णालयात हलवण्यात आले. ट्रम्प यांना प्रथमोपचार करून घरी सोडण्यात आले असून प्रपृती स्थिर आहे.
हल्ला झाल्यानंतर ट्रम्प काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी एक हाताने कान झाकला होता तर दुसऱया हाताने मूठ आवळून हात उंचावून लढा… असे आवाहन त्यांनी मतदारांना केलेय.

43 वर्षांनी पुन्हा हल्ला

अमेरिकेतील अध्यक्षपदाचे उमेदवार आणि अध्यक्ष यांच्या कारकीर्दीला अशा हल्ल्यांची काळी किनार आहे. आतापर्यंत 9 अध्यक्ष आणि उमेदवार यांच्यावर हल्ले झाले असून, अब्राहम लिंकन, जॉन एफ केनेडी यांच्यासारख्या काहींनी प्राणही गमावले आहेत. 43 वर्षांपूर्वी 1981 मध्ये तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्यावर वॉशिंग्टनमध्ये 30 मार्च 1981 रोजी जॉन हिंकले ज्युनियर याने सहा गोळ्या झाडल्या होत्या. त्यात रिगन गंभीर जखमी झाले होते. इतर तिघांनाही गोळ्या लागल्या होत्या. उमेदवार रॉबर्ट एफ केनेडी (5 जून 1968), अध्यक्ष जॉन एफ केनेडी (22 नोव्हे. 1963) या दोन्ही भावांचीही मारेकऱयांनी हत्या केली होती. 2016 मध्येही ट्रम्प प्रचार करत असताना एका 20 वर्षीय ब्रिटिश तरुणाने लास वेगास येथील सभेत एका पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. ट्रम्पना मारण्याचा आपला प्रयत्न होता, अशी कबुली त्याने दिली होती.

हल्लेखोर रीपब्लिकन पक्षाचा मतदार

थॉमस मॅथ्यु क्रुक्स (20) असे हल्लेखोराचे नाव असून त्याने रिपब्लिकन पक्षाचा मतदार म्हणून नोंदणी केली होती. तो पहिल्यांदाच मतदान करणार होता, अशी माहिती एफबीआयला मिळाली आहे. मॅथ्युने एआर 15 प्रकारच्या रायफलमधून शेजारच्या इमारतीतून 200 ते 300 फुटांवरून ट्रम्प यांच्या दिशेने गोळीबार केल्याचा संशय आहे. त्याने किमान 4 राऊंड्स गोळ्या झाडल्याची माहिती एफबीआयचे विशेष एजंट केव्हीन रोझेक यांनी दिली. हल्लेखोराचा फोटो जारी करण्यात आला आहे.

हत्येचाच कट होताः एफबीआय

हल्लेखोराने झाडलेली एक गोळी ट्रम्प यांच्या डोक्याच्या दिशेने जात असलेला फोटो व्हायरल होत आहे. न्यूयॉर्प टाईम्सचे छायाचित्रकार डग मिल्स यांनी हे छायाचित्र टिपलं आहे. ट्रम्प यांच्या हत्येचाच हा कट होता, असे एफबीआयने म्हटले आहे. हा हल्ला अमेरिकन सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेचं मोठं अपयश असल्याची टीका होऊ लागली आहे.

नेमकं काय घडलं?

ट्रम्प यांची प्रचारसभा चालू असताना चार वेळा गोळीबाराचा आवाज आला. हा आवाज ऐकून सर्वजण खाली बसले. ट्रम्प यांच्या कानाला काहीतरी लागलं होतं. त्यांनी कानाला हात लावताच त्यांच्या हाताला रक्त लागलं, तेही खाली वाकले. रक्तबंबाळ झाले. हा हल्ला असल्याचे सर्वांच्याच लक्षात आले. पुढच्याच क्षणी ट्रम्प यांचे अंगरक्षक आणि सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी ट्रम्प यांच्याभोवती कडं तयार केलं. हे सर्व जवान ट्रम्प यांना घेऊन व्यासपीठावरून उतरले. मात्र व्यासपीठावरून उतरताना ट्रम्प जवानांच्या कडय़ामधून बाहेर डोकावून लोकांना अभिवादन करत होते, घोषणा देत होते. सुरक्षा यंत्रणेच्या दक्षतेमुळेच ट्रम्प यांचे प्राण वाचू शकले. जलद प्रतिसादासाठी युनायटेड स्टेट्स सिक्रेट सर्व्हिस आणि कायदा अंमलबजावणी पथकाचे मी आभार मानतो, असे ट्रम्प यांनी नमूद केले.

गॉड ब्लेस अमेरिका

घटनेनंतर ट्रम्प यांनी एक्सवरून हल्ल्याची घटना कथन केली. आपल्या देशात अशाप्रकारची घटना घडणे अविश्वसनीय आहे. सध्याच्या घडीला हल्लेखोराबद्दल काहीही माहित नाही. पण, तो ठार झालेला आहे. मी गोळीबाराचा आवाज ऐकला, अचानक माझ्या कानातून रक्त वहायला लागले. खूप रक्त गेले. नेमके काय घडले हे माझ्या नंतर लक्षात आले. गॉड ब्लेस अमेरिका, असे ट्रम्प यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहीले आहे.

हिंसाचाराल थारा नाही – बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी घडल्याप्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. अशाप्रकारच्या घटनांना आपल्या देशात अजिबात थारा नाही. अशाप्रकारचा हिंसाचार अमेरिकेत घडायला नको, असे ते म्हणाले.

हल्ल्याने मी अस्वस्थ – मोदी

माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याने मी अस्वस्थ आहे. या हल्ल्याचा मी कठोर शब्दांत निषेध करत आहे. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला अजिबात थारा नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान केर स्टार्मर, रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारीया झखारोव्हा, दक्षिण कोरीयाचे अध्यक्ष युन सुक येऊल, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपींग, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीस यांनीही हल्ल्याचा निषेध केला आहे.

हल्ल्याचा तीव्र निषेध – राहुल गांधी

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध. अशा हल्ल्यांचा कडाडून विरोध केला पाहिजे, अशी प्रतिक्रीया हिंदुस्थानच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी एक्सवरून दिली आहे. ट्रम्प हे लवकरात लवकर बरे व्होवोत अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.