‘एच-1 बी’ व्हिसावर अमेरिकेचा फेरविचार, हिंदुस्थानींना दिलासा मिळण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील नवे बायडेन प्रशासन लवकरच ट्रम्प सरकारच्या ‘एच-1 बी’ व्हिसाबाबतच्या चुकीच्या निर्णयांचा फेरविचार करणार आहे.

परदेशी कामगारांसाठीचा अर्ज ‘आय -129’ पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे, असे अमेरिकी नागरिकत्व आणि इमिग्रेशन संस्था (यूएससीआयएस) म्हटले आहे. विपरित परिणाम करणाऱया निर्णयावर फेरविचार केला जाऊ शकतो. यामुळे हिंदुस्थानी तंत्रज्ञांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातील तीन निर्णय बायडेन सरकारने यापूर्वीच रद्द केले आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयामुळे ‘एच-1 बी’ व्हिसावर काम करणाऱया परदेशी कामगार आणि कर्मचाऱयांना विशेषतः हिंदुस्थानी अभियंते व तंत्रज्ञांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. ‘एच-1बी’ व्हिसा हिंदुस्थानींमध्ये विशेष प्रिय आहे. या व्हिसाच्या आधारे अमेरिकी कंपन्या उच्चशिक्षित आणि कौशल्यप्राप्त परदेशी कामगारांना नोकऱया देतात.

दरवर्षी विविध श्रेणींमध्ये एकूण 85 हजार व्हिसा जारी केले जातात. त्याची मुदत तीन वर्षे असते. ट्रम्प प्रशासनाने ‘एच-1 बी’ व्हिसासह अन्य वर्क व्हिसाशी संबंधित नियम अधिक कडक केले होते.