
विश्व मल्लखांब संघटनेचे महासचिव उदय देशपांडे यांच्या पुढाकाराने 2019 सालामध्ये पहिल्या मल्लखांब विश्वचषकाचे आयोजन मुंबईत करण्यात आले होते. या स्पर्धेला दणदणीत प्रतिसादही लाभला. आता मल्लखांबाच्या दुसऱया विश्वचषक स्पर्धेचा बिगुलही दणक्यात वाजला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरामध्ये 2022 सालामधील सप्टेंबर महिन्यात मल्लखांबाचा दुसरा विश्वचषक खेळवला जाणार आहे. सध्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत 20 देशांचा सहभाग निश्चित आहे; पण विश्व मल्ल्लखांब संघटनेकडून या स्पर्धेमध्ये 50 देशांचा सहभाग असावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मल्लखांब फेडरेशन यूएसए (अमेरिका) यांच्या वतीने ‘ऑनलाइन व्हर्च्युअल किक ऑफ मीटिंग’चे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विश्व मल्लखांब संघटनेसह इतर देशांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. या बैठकीत अमेरिकेत मल्लखांबाचा दुसरा विश्वचषक खेळवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
पुढील सोळा महिन्यांचे सादरीकरण
मल्लखांब फेडरेशन यूएसएचे ओंकार देशपांडे यांनी स्पर्धेसाठी पुढाकार घेतला असून संयोजन सचिव चिन्मय पाटणकर, मल्लखांब फेडरेशन यूएसएच्या अध्यक्षा प्रज्ञा पाटणकर, अमेरिका-कॅनडा या देशांमधील आजी-माजी खेळाडू, प्रशिक्षक, पालक यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आतापासून तयारी सुरू केली आहे. चिन्मय पाटणकर यांनी ऑनलाइन बैठकीत आतापासून वर्ल्ड कपपर्यंतच्या 16 महिन्यांमधील कार्यक्रमांचे उत्तम सादरीकरणही केले. यामध्ये शुभारंभ, एकत्रीकरण, क्रीडा ज्योत, एका आठवडय़ाचे मल्लखांब शिबीर, न्यूयॉर्क रोड शो, अमेरिकेतील दूतावासांच्या कार्यालयासमोर मल्लखांब प्रात्यक्षिके, सांस्कृतिक प्रदर्शन व दुसरा विश्वचषक या उपक्रमांचा समावेश होता. स्पर्धेला घवघवीत यश मिळावे यासाठी कार्यकर्त्यांची भक्कम फळीही यावेळी तयार करण्यात आली आहे.
या देशांचा सहभाग पक्का
अमेरिकेमध्ये होणाऱया मल्लखांब विश्वचषक स्पर्धेमध्ये 50 देशांचा सहभाग असायला हवी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. सध्या स्पेन, झेक प्रजासत्ताक, इटली, नॉर्वे, जर्मनी, व्हिएतनाम, बहरीन, ऑस्ट्रिया, मॉरीशस, दक्षिण आफ्रिका, रशिया, हाँगकाँग, लिथुएनिया, आयर्लंड, ग्रीस, अर्जेंटिना, व्हेनेझुएला, स्लोवेनिया, फिलीपाइन्स व भूतान या देशांतील खेळाडूंचा सहभाग निश्चित आहे.
अभिमानास्पद बाब – उदय देशपांडे
मल्लखांब हा महाराष्ट्रातील मातीतला खेळ सातासमुद्रापार पोहोचलाय. मुंबईनंतर मल्लखांबाचा दुसरा विश्वचषक अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे होणार आहे. या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे, असे भावुक उद्गार विश्व मल्लखांब संघटनेचे महासचिव उदय देशपांडे यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना काढले.




























































