आमदार अमित देशमुख यांनी घेतली निलंगेकरांची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभय मिरजकर । लातूर

लातूर जिल्ह्याकडे भाजपने जास्त लक्ष पुरवले आहे. त्यामुळे काँग्रेस आमदार अमित देशमुख अधिकच सजग आहेत. बाभळगावच्या गढीवरून त्यांनी निलंगा येथील निलंगेकर यांच्या वाड्यावर जाऊन निलंगेकर यांची भेट घेतली. लातूर जिल्ह्यात या राजकीय भेटीची चर्चा रंगली आहे. राजकारणामध्ये दीर्घकाळ कोणी कोणाचा मित्र किंवा शत्रू नसतो, असे म्हटले जाते. याची प्रचिती लातूरकरांना अनेकदा आली आहे. देशमुख आणि निलंगेकर यांच्यातील संबंध सगळ्यांना माहित आहेत. त्यामुळे या भेटीची चर्चा रंगली आहे.

भाजपने सध्या लातूर जिल्ह्याकडे जास्त लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नुकताच लातुरचा दौरा केला होता. लातूर शहर महानगरपालिका, लातूर जिल्हा परिषद भाजपने जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. मात्र, काँग्रेसची पाळेमुळे जिल्ह्यात खोलवर रुजलेली आहेत. जिल्ह्यातील सहा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असले तरी तीन मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहेत. काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्व नेते एकत्र आले तरच निवडणुकांमध्ये यश मिळू शकते, हे लक्षात आल्याने आमदार अमित देशमुख यांनी भेटीगाठीचा सपाटा सुरू केला आहे.

लातूर जिल्ह्यात बाभळगावची देशमुखांची गढी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे निलंग्यातील निलंगेकरांचा वाडा प्रसिद्ध आहे. नुकतेच अशोक पाटील निलंगेकर यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवराज पाटील चाकूरकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. या पार्श्‍वभूमीवर आमदार अमित देशमुख यांनी बाभळगावच्या गढीमधून बाहेर पडत निलंगा येथील निलंगेकर यांच्या वाड्यावर भेट दिली. माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, अशोकराव पाटील निलंगेकर यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. या भेटीने लातूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सर्व जिल्ह्यात या भेटीची सध्या चर्चा सुरू आहे. दादासाहेबांनी आणि भैय्यासाहेबांनी अमित देशमुख यांना वाड्यावर यायला भाग पाडले असा प्रचार निलंगेकर समर्थक करीत आहेत. तर लातूर जिल्ह्याचे नेतृत्व अमित देशमुख करतील असे देशमुख समर्थकांना वाटत आहे.