
सामना ऑनलाईन । चेन्नई
जम्मू कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 खूप आधीच रद्द करायला हवे होते, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले. कलम 370 रद्द करण्याबाबत आपल्या मनात कोणताही संभ्रम नव्हता. आता हे कलम रद्द झाल्याने कश्मीरमधला दहशतवाद संपणार असून कश्मीरचा विकास होणार असल्याचा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ‘लिसनिंग, लर्निंग अॅण्ड लिडिंग’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शहा बोलत होते. आदर्श राजकारण कसे करावे हे नायडू यांच्याकडून शिकण्यासारखे आहे, असेही शहा म्हणाले. शांतपणे ऐकणे, ते समजून घेऊन शिकणे आणि समाजाचे नेतृत्व करणे या गोष्टीही त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत, अशा शब्दांत शहा यांनी नायडू यांचे कौतुक केले.
Amit Shah: As a legislator, I firmly believe Art 370 should’ve been removed long ago. As a Home Minister, there was no confusion in my mind about the consequences of removing Art 370. I’m confident terrorism in Kashmir will finish & it’ll move ahead on the path of development now pic.twitter.com/l9bRR1AGqi
— ANI (@ANI) August 11, 2019
विद्यार्थीदशेत असताना नायडू यांनी कलम 370 विरोधात आंदोलन केले होते. या कलमाविरोधात आंदोलन करणारे नायडू राज्यसभेचे सभापती असतानाच हे कलम रद्द करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला, हे विधीचे विधान असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. राज्यसभेत हे विधेयक मांडताना मनावर दडपण असल्याचेही शहा यांनी सांगितले. राज्यसभेत हे विधेयक मांडल्यावर कशी प्रतिक्रिया येईल, असा विचार मनात घोळत होता. आंध्र प्रदेशच्या विभाजनावेळी झालेल्या घटना जनतेला माहित आहेत. हे विधेयक मांडल्यावर अशा प्रतिक्रिया उमटू नये, असे वाटत होते. मात्र, नायडू यांनी उत्तमप्रकारे राज्यसभेचे कामकाज चालवले. त्यामुळे विधेयक मंजूर होईपर्यंत सदनाच्या प्रतिष्ठेला बाधा येईल, असे कोणतेही वर्तन झाले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यसभेत आमचे बहुमत नाही. मात्र, तरीही आधी हे विधेयक राज्यसभेत मांडून नंतर लोकसभेत मांडण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
























































