बिग बी अमिताभ पहिल्यांदाच तामीळ चित्रपटात झळकणार; राम्यासोबत केमिस्ट्री जुळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलीवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन पहिल्यांदाच तामीळ चित्रपटात दिसणार आहेत. बाहुबलीतील राम्या कृष्णन या अभिनेत्रीसोबत त्यांची केमिस्ट्री जुळणार आहे. उर्थना मनिथम या चित्रपटाच्या मिनित्ताने अमिताभ राम्यासोबत 20 वर्षांनी एकत्र येत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन तमीळवानान करत आहेत. हा चित्रपट हिंदीमध्येही डब करण्यात येणार आहे.

याआधी अमिताभ आणि राम्या छोटे मियां, बडे मियांमध्ये एकत्र दिसले होते. हा चित्रपट 1998 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील त्यांची अदाकारी रसिकांना भावली होती. तामिळ चित्रपटातील अमिताभ आणि राम्या यांची जोडीही रसिकांना भावेल. हे दोघे चित्रपटात वेगळ्या भूमिकेत दिसतील असे दिग्दर्शक तमीळवानान यांनी सांगितले. या दोघांना एकत्र आणून त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या मुंबईत चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे.

चित्रपटात मुख्य भूमिका असलेल्या एस.जे. सूर्या यांनी ट्विटरवर अमिताभसोबतचा आपला फोटो अपलोड केला आहे. अमिताभ यांनीही ट्विटरवरून चित्रपटातील आपल्या भूमिकेचा फोटो अपलोड केला आहे. राम्याची भूमिका असलेला बाहुबली बॉक्स ऑफीसवर हिट ठरला होता. तसेच राम्याने तामीळ चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. तर अमिताभ यांचा बदला चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. अमिताभ यांच्या पहिल्या तामीळ चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास चित्रपटातील कालाकारांनी व्यक्त केला आहे.